Omar Lulu Case :  सिनेइंडस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. दिग्दर्शकाने आपल्यावर बलात्कार केला असल्याची तक्रार एका अभिनेत्रीने पोलिसांत दाखल केली आहे. अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियरचा चित्रपट ओरू ओदार लवचा दिग्दर्शक ओमर लुलू याच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. पीडित तरुणीने केरळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, दिग्दर्शक ओमरने हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. 


पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, एर्नाकुलम ग्रामीण पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की,  पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.  मात्र, याप्रकरणी अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी ठोस पुरावे जमा केल्यानंतर आरोपी दिग्दर्शक ओमर लुलूला अटक केली जाऊ शकते. ओमर लुलूविरुद्ध आयपीसी कलम 376 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


माझ्यावरील आरोप खोटे...


दिग्दर्शक ओमरने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. ओमरने सांगितले की, माझी या मुलीशी खूप दिवसांपासून मैत्री आहे. ती माझ्यासोबत अनेक सहलींना आली होती. मात्र, आमच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला होता आणि सहा महिन्यांपासून आमचा संबंध नव्हता. तिने माझ्या अलीकडच्या चित्रपटातही काम केले होते. आता, नवीन चित्रपट सुरू होताच, तिने अशी तक्रार दाखल केली आहे.






ओमर लुलूने 2016 मल्याळम चित्रपट हॅपी वेडिंगद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. त्यांचा हा चित्रपट त्या वर्षी मल्याळम उद्योगातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटाने 100 दिवसांत 13.70 कोटींची कमाई केली होती. यानंतर त्याने 2019 मध्ये चंक्झ (Chunkz) आणि ओरू ओदार लव (Oru Odaar Love) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटातूनच प्रिया प्रकाश वॉरियर ही प्रसिद्धीच्या झोतात येऊन नॅशनल क्रश झाली होती. या चित्रपटातील तिचा विंक व्हिडीओ व्हायरल झाला होता.