मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेला विक्की कौशलचा छावा सिनेमा जोरदार गाजला. सर्वत्र त्याची जोरदार चर्चा झाली. छावा चित्रपटाने 800 कोटींची कमाई केली. संपूर्ण महाराष्ट्राने सिनेमा डोक्यावर घेतला. सिनेमाचं आणि त्यामध्ये काम केलेल्या सर्वांचं मोठं कौतुक होत असतानाच आता छावा चित्रपटाच्या यशाचं पूर्ण श्रेय विक्कीला देणं योग्य नाही, असं मत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी व्यक्त केलं आहे. विक्की कौशलने कधीच म्हणू नये की लोक मला बघायला आले होते, असंही मांजरेकरांनी पुढे म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या चर्चा आहे. मात्र, महेश मांजरेकर यांनी व्यक्त केलं आहे. ते असं का म्हणाले? जाणून घ्या सविस्तर.

नेमकं काय म्हणाले मांजरेकर?

महेश मांजरेकर यांनी मिर्ची मराठीला दिलेल्या मुलाखतीत छावा बाबत बोलताना म्हटलं की, "विक्की कौशल हा खूप चांगला अभिनेता आहे. त्याचा छावा सिनेमा चांगला चालला. छावा चित्रपट 800 कोटींपर्यंत गेला. पण विक्की कौशलने कधीच म्हणून नये की लोक मला बघायला आले. कारण मग ते आधीचे पाच पिक्चरपण बघायला आले असते. प्रेक्षक तुझं कॅरेक्टर बघायला आलेत. याच्या आधीचे त्याचे पाच पिक्चर नव्हते चालले", असंही पुढे त्यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, "म्हणजे माझ्या महाराष्ट्राने आज हिंदी इंडस्ट्रीला वाचवलं आहे, एवढं लक्षात ठेवा. आज छावा जोरात चालला, त्याचं 80 टक्के क्रेडिट हे महाराष्ट्राला जातं. 80 टक्क्यातील 90 टक्के क्रेडिट हे पुण्याला जातं आणि बाकीचं महाराष्ट्राला जातं. त्यामुळे आज महाराष्ट्र इंडस्ट्री तारू शकतो, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

स्टार डॉमिनेटेड इंडस्ट्री आता बदलतेय 

महेश मांजरेकर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत होणाऱ्या बदलांवरही भाष्य करताना ते म्हणाले, "पूर्वी फक्त स्टार्सवर सिनेमे चालायचे. पण आता तसं उरलेलं नाही. आता फार पिक्चर चालले नाहीत. स्टार डॉमिनेटेड इंडस्ट्री होती. पण आता त्यांना कळायला लागलं आहे की फक्त स्टार्सना आता नंबर मिळत नाहीये", असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

130 कोटींचं बजेट अन् कमाई 800 कोटी पार

2025 मध्ये ब्लॉकबस्टर छावा प्रदर्शित झाला, जो केवळ देशातच नाही तर जगभरात हिट झाला. छावानं बॉक्स ऑफिसवर 800 कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय, आता छावा ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालतोय. ओटीटीवरची टॉप 10 ट्रेडिंग लिस्ट पुन्हा एकदा बदलली आहे. यावेळी, 2025 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटानं ओटीटीची शर्यत जिंकली आहे आणि पहिलं स्थान पटकावलं आहे.'छावा' रिलीज झाला आणि त्यानं कित्येक दिवस बॉक्स ऑफिसवर गटांगळ्या खाणाऱ्या बॉलिवूडला नवसंजीवनी दिली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 2025 चा सर्वात मोठा ओपनर म्हणून 'छावा'नं बहुमान मिळवला. छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित 'छावा' चित्रपटानं बॉक्स ऑफिस गाजवलंच, पण प्रेक्षकांच्या मनातही मानाचं स्थान मिळवलं. बॉक्स ऑफिस गाजवणारा 'छावा' 14 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

'छावा'मध्ये विक्की कौशलनं मुख्य भूमिका साकारली. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विक्की कौशलनं उत्कृष्ट कामगिरी केली आणि त्याच्या दमदार अभिनयाचं खूप कौतुकही झालं. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदाना देखील दिसली होती.'छावा' चित्रपटाची कथा मुघल सम्राट औरंगजेबाला काँटे की टक्कर देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित होती. या चित्रपटात औरंगजेबाची भूमिका साकारून अक्षय खन्नानं प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानं रुपेरी पडद्यावर साकारलेला क्रूरकर्मा शक्तिशाली खलनायकीपणा चर्चेत राहिला.विक्की कौशल आणि अक्षय खन्ना यांचा 'छावा' चित्रपट 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. हा चित्रपट दोन्ही स्टार्सच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटही ठरला. आशुतोष राणा, विनीत कुमार सिंह, दिव्या दत्ता, प्रदीप सिंग रावत, डायना पेंटी यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले.