Scott Adams Passed Away: ऑफिसमधील राजकारण, अकार्यक्षम बॉस आणि व्यवस्थेतील विसंगतींवर नेमका, बोचरा उपरोध करणारी ‘डिल्बर्ट’ ही कॉमिक स्ट्रिप जगभरातील नोकरदार वर्गाचा आवाज बनली होती. या लोकप्रिय व्यंगचित्रमालिकेचे जनक, अमेरिकन कार्टूनिस्ट स्कॉट अॅडम्स यांचे वयाच्या ६८व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या निधनाने व्यंगचित्रांच्या जगात एक महत्त्वाचं पर्व संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
वादग्रस कारकीर्द, कॉमिकही बॅन झालेलं
स्कॉट अॅडम्स यांची कारकीर्द जितकी यशस्वी होती, तितकीच ती वादग्रस्तही ठरली. एका बाजूला जगातील सर्वाधिक ओळखल्या जाणाऱ्या कार्टूनिस्टांमध्ये त्यांचा समावेश होता. ‘डिल्बर्ट’ ही कॉमिक स्ट्रिप तब्बल 65 देशांतील दोन हजारांहून अधिक वृत्तपत्रांत प्रसिद्ध होत होती. मात्र दुसऱ्या बाजूला, 2023 मध्ये केलेल्या वंशवादी वक्तव्यांमुळे त्यांच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसला.
या वादानंतर अनेक नामांकित अमेरिकी माध्यमांनी ‘डिल्बर्ट’ कॉमिक स्ट्रिप प्रकाशित करणं थांबवलं. पुलित्झर पुरस्कार विजेते कार्टूनिस्ट डॅरिन बेल यांनी स्कॉट अॅडम्स यांच्या वक्तव्यांना अपमानास्पद ठरवलं, तर या प्रकरणावर उद्योगपती एलन मस्क यांनीही नाराजी व्यक्त केली होती. एका यूट्यूब चर्चेदरम्यान केलेल्या कृष्णवर्णीय समुदायाबाबतच्या वक्तव्यांमुळे अॅडम्स यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.
वाद वाढल्यानंतर स्कॉट अॅडम्स यांनी स्पष्टीकरण देत आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढल्याचा दावा केला. आपण द्वेष टाळण्याचा संदेश देत होतो, असं त्यांनी सांगितलं. मात्र वॉशिंग्टन पोस्टसह अनेक माध्यमांनी त्यांच्या विधानांमुळे समाजात फूट पडण्याचा धोका निर्माण होत असल्याचं मत व्यक्त केलं.
अनेक पुरस्कारांनी आलं गौरवण्यात
2000 सालापर्यंत ‘डिल्बर्ट’ 57 देशांतील 19 भाषांमध्ये दोन हजारांहून अधिक वृत्तपत्रांत प्रसिद्ध होत होती. या यशामुळे स्कॉट अॅडम्स यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. मात्र आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात वादांनी त्यांच्या प्रतिमा झाकोळली गेली.
8 जून 1957 रोजी जन्मलेले स्कॉट रेमंड अॅडम्स यांनी करिअरची सुरुवात टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर म्हणून केली होती. काही काळ त्यांनी बँकेतही काम केलं. मात्र नंतर कार्टून कलेत स्वतःला झोकून देत त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. 1989 मध्ये प्रथम प्रकाशित झालेल्या ‘डिल्बर्ट’ने 1990 च्या दशकात प्रचंड लोकप्रियता मिळवली. ऑफिसमधील अनुभवांवर आधारित पात्रांमुळे ही मालिका सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या मनात घर करून गेली.कर्करोगाशी अखेरपर्यंत झुंज देताना स्कॉट अॅडम्स यांनी दिलेला शेवटचा संदेश “Be useful” आज त्यांच्या आयुष्याची आणि कार्याची आठवण करून देणारी सर्वात मोठी ओळख ठरत आहे.