मुंबई : नवी मुंबईतील नागरिकांचं दैवत असलेले लोकनेते दिबा पाटील (Di Ba Patil) यांचं जीवनचरित्र लवकरच रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत. लेखक दिग्दर्शक मुकेश कांबळे यांनी दिबा पाटील यांचं चरित्र रुपेरी पडद्यावर आणणार असल्याची घोषणा केली होती. अखेर तब्बल पाच वर्षे रिसर्च आणि स्क्रिप्टिंगचं काम पूर्ण झाल्यानंतर या चित्रपटाचा टीझर देखील रिलिज करण्यात आला आहे. 


फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेणारे अनेक नेते आहेत पण त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन अविरत समाजासाठी झटणाऱ्या नेत्यांपैकी दि. बा. पाटील हे सच्चे लोकनेते होते. विधानसभा, लोकसभा गाजवणाऱ्या तत्वनिष्ठ लोकनेत्याला जेव्हा त्याचे राहते घर देखील श्रमदानाने लोकं बांधून देतात, तेव्हा असा नेता लोकांसाठी किती प्राणपणाने झिजला, लढला असेल याची आपण कल्पनाच करू शकतो. 



प्रबोधनकार ठाकरे, शरद पवार ते अगदी अलिकडच्या नेत्यांसोबत महाराष्ट्र गाजवून सोडणाऱ्या नेत्याचे शौर्य आजच्या पिढीला कळण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती करीत आहोत, असं कांबळे यांनी सांगितलं आहे.स्थानिक असलेल्या मुकेश कांबळे यांनी याआधीही काही मराठी चित्रपट आणि मालिकांसाठी काम केलं आहे. 


नवी मुंबई वसवण्यासठी ज्या 95 गावांतील जमिनी सरकारने घेतल्या त्याविरोधात इथल्या शेतकऱ्यांनी दिबांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे लढा दिला. अगदी युध्दसदृश्य आंदोलने देखील झाली. या आंदोलनांचा थरार दिबा या चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.


दिबा पाटील यांच्या परिवारानं देखील या चित्रपटाचं स्वागत केलं आहे. कुटुंबापेक्षा जास्त दिबा पाटील साहेबांनी समाजाचाच विचार केला. त्यांनी स्वत:चं आयुष्य समाजासाठी वाहून घेतलं होतं. त्यामुळं त्यांचं जीवन जर रुपेरी पडद्यावर दिसत असेल तर त्याचं स्वागत आहे, असं दिबा पाटील यांचे पुत्र अतुल पाटील यांनी म्हटलं आहे.


सुरुवातीला दिबा पाटील यांच्यावर एक डॉक्युमेंट्री करण्याचा विचार होता. परंतु दिबा यांच्या कामाला आणि त्यांच्या कर्तृत्वाला एवढ्यात मांडणं अशक्य आहे. त्यांच्या कार्याचा आवाका मोठा आहे. त्यामुळं चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं मुकेश कांबळे यांनी म्हटलं आहे. 


दिबा पाटील यांनी हजारो प्रकल्पग्रस्तांसाठी मोलाचं काम केलं आहे. जमिनीवर उतरुन वेळोवेळी संघर्ष केला आहे. सोबतच संसद, विधिमंडळात देखील वेळोवेळी सामान्यांचा आवाज बनलेल्या दिबा पाटील यांच्यावरील सिनेमा कसा असेल याची उत्सुकता लागून राहिली आहे.