Dhurandhar: आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित झाला. रिलीजपासूनच काही शब्द आणि संवादांवर आक्षेप घेतला जात होता. आता माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या (IB) सूचनेनुसार चित्रपटातील दोन शब्द म्यूट करून आणि एका संवादात बदल करून नवं सुधारित व्हर्जन पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Continues below advertisement

‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी करत ‘पठाण’, ‘जवान’, ‘छावा’सह अनेक चित्रपटांचे कलेक्शन मागे टाकले आहे. प्रेक्षकांकडून चित्रपटाला मोठी दाद मिळत असली, तरी दाखवलेल्या राजकीय संदर्भांमुळे काहींनी यावर ‘प्रोपेगंडा’चा आरोपही केला होता.

नव्या व्हर्जनसाठी थिएटर्सना सूचना 

बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार, 31 डिसेंबर 2025 रोजी देशभरातील सिनेमागृहांना ई-मेल पाठवण्यात आला. या ई-मेलमध्ये चित्रपटाच्या DCP (डिजिटल सिनेमा पॅकेज)मध्ये बदल झाल्याची माहिती देण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रालयाच्या निर्देशांनंतर निर्मात्यांनी दोन शब्द म्यूट केले असून एका संवादात बदल करण्यात आला आहे. काढून टाकण्यात आलेल्या शब्दांपैकी एक शब्द ‘बलूच’ असल्याचे सांगितले जात आहे. थिएटर्सना 1 जानेवारी 2026 पासून नवं व्हर्जन डाउनलोड करून दाखवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Continues below advertisement

बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘धुरंधर’ला प्रदर्शित होऊन जवळपास महिना पूर्ण होत आहे. चित्रपटाने जगभरात 1117.9 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. भारतात 27व्या दिवशी 11 कोटी कमाई करत आतापर्यंत एकूण 723.25 कोटी रुपयांहून अधिक कलेक्शन केले आहे.

कलाकार व कथानक चित्रपटात रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत असून तो पाकिस्तानातील ल्यारी शहरात दहशतवाद्यांमध्ये घुसखोरी करणाऱ्या भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारतो. त्याच्यासोबत संजय दत्त, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन आणि राकेश बेदी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच नवीन कौशिक, सौम्या टंडन, नसीम मुगल, दानिश पंडोर आणि गौरव गेरा हेही चित्रपटात झळकतात. दरम्यान, चित्रपटाची काही खाडी देशांत बंदी घालण्यात आली आहे.

‘धुरंधर 2’ कधी?

पहिल्या भागाच्या यशानंतर ‘धुरंधर 2’ 19 मार्च 2026 रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे.