Ahilyanagar Mahanagarpalika Election 2026: अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत (Ahilyanagar Mahanagarpalika Election 2026) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सर्वाधिक म्हणजेच 54 उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या शिंदेसेनेच्या पाच उमेदवारांचे अर्ज छाननीअंती अवैध ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणूक रणांगणात शिंदेसेनेचे उमेदवार आता 49 वर आले असून, हा पक्षासाठी निवडणुकीपूर्वीच मोठा झटका मानला जात आहे.

Continues below advertisement

अहिल्यानगर महापालिकेच्या 68 जागांसाठी एकूण 788 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. बुधवारी विविध निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत एकूण 17 अर्ज अवैध ठरवून बाद करण्यात आले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे.

Ahilyanagar Mahanagarpalika Election 2026: शिवसेनेच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद

शिंदेसेनेच्या पाच उमेदवारांचे अर्ज विविध कारणांमुळे बाद ठरले. एका उमेदवाराचा अर्ज अनुमोदकाची चुकीची स्वाक्षरी असल्याने, एका उमेदवाराचा एबी फॉर्म सादर न केल्याने, एका उमेदवाराने एबी फॉर्मची झेरॉक्स प्रत जोडल्याने, तर दोन उमेदवारांचे अर्ज एबी फॉर्मवर खाडाखोड व व्हाईटनरचा वापर केल्यामुळे अवैध ठरवण्यात आले. ऐनवेळी पक्षप्रवेश झालेल्या काही उमेदवारांच्या कागदपत्रांमध्ये तांत्रिक त्रुटी राहिल्याचे छाननीदरम्यान स्पष्ट झाले. या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), एमआयएम, आम आदमी पार्टी, बसपा तसेच अपक्ष उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले होते. सावेडी तहसील कार्यालय, जुने महापालिका कार्यालय, भूसंपादन कार्यालय, बुरुडगाव प्रभाग समिती, केडगाव उपकार्यालय आदी ठिकाणी उमेदवार, सूचक व अनुमोदकांच्या उपस्थितीत अर्जांची छाननी करण्यात आली.

Continues below advertisement

Ahilyanagar Mahanagarpalika Election 2026: शरद पवार गटाच्या एका उमेदवाराचाही अर्ज बाद

छाननीदरम्यान काही उमेदवारांवर अतिक्रमण, महापालिकेची करथकबाकी, कागदपत्रांतील त्रुटी आदी स्वरूपाच्या हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. या हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीनंतर बहुतांश हरकती फेटाळण्यात आल्या असल्या, तरी तांत्रिक त्रुटी असलेल्या अर्जांवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेत अर्ज बाद केले. दरम्यान, शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या एका उमेदवाराचाही अर्ज अवैध ठरला आहे. 

Ahilyanagar Mahanagarpalika Election 2026: माघारीनंतरच अंतिम राजकीय समीकरण स्पष्ट होणार

मात्र, शिंदेसेनेच्या ज्या उमेदवारांचे पक्षीय अर्ज बाद झाले, त्यांचे अपक्ष अर्ज ग्राह्य धरण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आजपासून उमेदवारी अर्ज माघारीचा पहिला दिवस असून 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे कोणते उमेदवार माघार घेतात, कोणत्या प्रभागात लढत रंगते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. माघारीनंतरच अहिल्यानगर महापालिकेतील अंतिम राजकीय समीकरण स्पष्ट होणार आहे.

आणखी वाचा 

BMC Election: बी. काॅम पास शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला! एबी फॉर्म दिला नाही, थेट कलर झेरॉक्स जोडली, निवडणूक आयोगाने सुद्धा चक्क ग्राह्य धरली!