Dhurandhar Box Office: रणवीर सिंगची अ‍ॅक्शन-थ्रिलर ‘धुरंधर’ बॉक्स ऑफिसवर सध्या वादळी घोडदौड करत आहे. अवघ्या 24 दिवसांत या चित्रपटाने जागतिक पातळीवर 1,050 कोटी रुपयांचा टप्पा पार करत 1,064 कोटींची कमाई केली असून, भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सातवा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. रिलीजनंतर चौथ्या रविवारी डिसेंबर 28 रोजी, ‘धुरंधर’ने वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर 1,064 कोटींचा आकडा गाठत शाहरुख खानचा ‘पठाण’ आणि प्रभासचा ‘कल्की 2898 AD’ यांना मागे टाकलं. त्यामुळे या वर्षातील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये ‘धुरंधर’ने आपलं स्थान पक्कं केलं आहे.

Continues below advertisement

चौथ्या विकेंडला धुरांधरने किती कमावले?

आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने आठवड्यानुवारी नवनवे विक्रम रचले आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात दमदार कमाई केल्यानंतर चौथ्या विकेंडलाही ‘धुरंधर’ने 62 कोटींची भक्कम कमाई केली. सलग चौथ्या आठवड्यातही प्रेक्षकांचा उत्साह तसाच कायम असल्याचं दिसून येत आहे.देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर’ने आतापर्यंत 690.25 कोटींची नेट कमाई केली असून, ग्रॉस कमाई 828.25 कोटींवर पोहोचली आहे, अशी माहिती सॅक्निल्ककडून देण्यात आली आहे. ट्रेड अ‍ॅनालिस्ट्सच्या मते, येत्या काही दिवसांत चित्रपट भारतात 700 कोटींचा नेट टप्पा सहज पार करेल.

परदेशातही ‘धुरंधर’ला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. ख्रिसमस सुट्ट्यांचा मोठा फायदा चित्रपटाला झाला असून, ओव्हरसीज मार्केटमध्ये आतापर्यंत 26 दशलक्ष डॉलरहून अधिक कमाई झाली आहे. यामुळे जागतिक कमाईने 1,000 कोटींचा ऐतिहासिक टप्पा सहज ओलांडला आहे.

Continues below advertisement

रेकॉर्ड ब्रेक कमाई 

एका दिवसातच म्हणजे रविवारी, चित्रपटाने जगभरात 30 कोटींपेक्षा अधिक कमाई करत ‘कल्की 2898 AD’ (1,042 कोटी) आणि ‘पठाण’ (1,055 कोटी) यांची अंतिम कमाई मागे टाकली. आता ‘धुरंधर’ची नजर ‘जवान’, ‘KGF चॅप्टर 2’ आणि ‘RRR’ यांच्या आकड्यांकडे आहे. मात्र, ‘दंगल’, ‘बाहुबली 2’ आणि ‘पुष्पा 2’ हे चित्रपट सध्या तरी आघाडीवर आहेत.

‘धुरंधर’मध्ये रणवीर सिंगने हमझा या भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली असून, तो कराचीतील अंडरवर्ल्ड आणि दहशतवादी नेटवर्कमध्ये घुसखोरी करताना दिसतो. चित्रपटात अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि आर. माधवन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.विशेष म्हणजे, या वर्षात ‘पुष्पा 2’च्या डब्ड हिंदी व्हर्जननंतर इतकी मोठी देशांतर्गत कमाई करणारा ‘धुरंधर’ हा दुसरा हिंदी चित्रपट ठरला आहे. त्यामुळे हिंदी सिनेमासाठी हा क्षण ऐतिहासिक मानला जात आहे. दरम्यान, ‘धुरंधर: पार्ट 2’ या सिक्वेलची तयारी सुरू असून, तो मार्च 2026 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सध्याचा वेग पाहता, ‘धुरंधर’ फ्रँचायझी आणखी मोठी होण्याची चिन्हं दिसत आहेत.