Dhurandhar Box Office Day 29: रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असलेल्या ‘धुरंधर’च्या बॉक्स ऑफिस कमाईत 29व्या दिवशी पहिल्यांदाच मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. जवळपास महिनाभर थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर, पाचव्या शुक्रवारी (2 जानेवारी 2026) या चित्रपटाची कमाई सिंगल डिजिटमध्ये आली आहे. तरीही 800 कोटींचा टप्पा गाठण्याची आशा अजून कायम आहे.

Continues below advertisement

नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. आदित्य धर दिग्दर्शित ही जबरदस्त स्पाय थ्रिलर फिल्म 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारी हिंदी फिल्म ठरली असून, 1 जानेवारी 2026 रोजीही तिने भरघोस कमाई केलेली. मात्र, वर्षाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रिलीजच्या 29व्या दिवशी कमाईत पहिल्यांदाच मोठी घट नोंदवण्यात आली आहे.

 29व्या दिवशी किती कमाई?

रणवीर सिंहसोबत अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर. माधवन आणि संजय दत्त यांसारख्या दमदार कलाकारांची फौज असलेला ‘धुरंधर’ 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. 1 जानेवारी 2026 रोजी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चार आठवडे पूर्ण केले. आतापर्यंत प्रत्येक आठवड्यात या फिल्मने रेकॉर्डब्रेक कमाई करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

Continues below advertisement

आत्तापर्यंत कशी राहिली धुरंधरची कमाई?

पहिल्या आठवड्यात ‘धुरंधर’ने 207.25 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात हा आकडा 253.25 कोटींवर पोहोचला, तर तिसऱ्या आठवड्यात 172 कोटींची कमाई झाली. चौथ्या आठवड्यातही चित्रपटाने 106.5 कोटी रुपये कमावले.

मात्र, सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, 29व्या दिवशी म्हणजेच पाचव्या शुक्रवारी ‘धुरंधर’ने 8.75 कोटींची कमाई केली आहे. ही या चित्रपटाची पहिली सिंगल डिजिट कमाई ठरली आहे. यासह 29 दिवसांतील एकूण देशांतर्गत कमाई 747.75 कोटी रुपये झाली आहे.

800 कोटींपासून किती दूर?

29व्या दिवशी कमाई घटली असली, तरी ‘धुरंधर’ अजूनही बॉक्स ऑफिसवर आघाडीवर आहे. पाचव्या शनिवारी हा चित्रपट 750 कोटींचा टप्पा पार करेल, असा अंदाज आहे. आता या फिल्मचे पुढील लक्ष्य 800 कोटीच्या टप्प्यात प्रवेश करण्याचे आहे.

हा टप्पा गाठण्यासाठी ‘धुरंधर’ला अजून सुमारे 50 कोटींची कमाई करावी लागणार आहे. पाचव्या वीकेंडला जर पुन्हा एकदा कमाईत वाढ झाली, तर 800 कोटींचा ऐतिहासिक टप्पा गाठणं अशक्य नाही. तसे झाल्यास ‘धुरंधर’ हा विक्रम करणारी पहिलीच बॉलिवूड फिल्म ठरेल. धुरंधर’ 800 कोटींचा टप्पा गाठणार की नाही एवढीच उत्सुकता प्रेक्षकांना लागून आहे.