Dhurandhar: 5 डिसेंबर 2025 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ने (Dhurandhar Box Office) बॉक्स ऑफिसवर अक्षरशः वादळ उठवलं आहे. 17 दिवसांतच चित्रपटाने नवनवे विक्रम रचले. वर्ल्डवाइड कमाईचा आकडा तब्बल 800 कोटींच्या दिशेने झेपावत आहे. अशातच या चित्रपटातील एका भावनिक सीनमुळे अभिनेत्री सौम्या टंडन (Saumya Tandan) सध्या चर्चेत आली आहे.
धुरंधरमध्ये सौम्या टंडनने अक्षय खन्नाच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तिची एंट्रीच चित्रपटात धक्कादायक वळण घेऊन येते. मुलाच्या हत्येनंतर ती कथानकात दाखल होते. हा सीन सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला असून, त्याबद्दलच सौम्याने तिच्या भावना सोशल मीडिया पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत.
“हा माझा एंट्री सीन होता…”
सौम्या टंडनने एक्सवर लिहिलं की, “हा चित्रपटातील माझा एंट्री सीन होता आणि यासाठी मला जितकं प्रेम मिळालं, त्यानं मी भारावून गेले आहे. त्या सीनमध्ये मुलाच्या मृत्यूमागचं कारण असलेल्या नवऱ्याविषयीचा राग, असहाय्यतेतून आलेली निराशा आणि वेदनेची खोली अशा एकाच वेळी सगळ्या भावना मी अनुभवल्या.” असं तिनं म्हटलं होतं. तिने पुढे एक खुलासा केला, तिने लिहिलं की, “आदित्य धर यांच्या सांगण्यावरून मी अक्षय खन्नाला क्लोजअपमध्ये खरंच एकदा कानशिलात लगावली, जेणेकरून सीन अधिक वास्तववादी वाटेल. मी चीट करू शकले असते, पण माझं नशीब तसं नव्हतंच. माझा ब्रेकडाऊन क्लोजअप मात्र सिंगल टेकमध्येच पूर्ण झाला.”
प्रेयर मीट सीनबद्दलही भावना व्यक्त
एका फोटोबद्दल बोलताना सौम्याने लिहिलं, “हा माझ्या मुलाच्या मृत्यूनंतरचा प्रेयर मीटचा सीन आहे. त्या क्षणी जो वेदनेचा अनुभव घेतला, तो आजही माझ्यासोबत आहे. हा अभिनय नव्हता, तर थेट माझ्या मनातून आलेली भावना होती.” या पोस्टमध्ये अभिनेत्रीने धुरंधरच्या सेटवरील दोन भावनिक फोटो शेअर केले आहेत.
चाहत्यांच्या प्रतिक्रिया
सौम्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिलं, “तुमची उपस्थिती प्रत्येक सीनमध्ये जाणवते.” तर दुसऱ्याने म्हटलं, “हा सीन सीन वाटत नव्हता,ती खरचएक वेदनादायी जखम वाटली" बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी करत असलेल्या ‘धुरंधर’मधील हा भावनिक क्षण आणि सौम्या टंडनचा अभिनय प्रेक्षकांच्या लक्षात राहतोय.