Sachin Pilgaonkar On Dharmendra: बॉलिवूड (Bollywood News) दिग्गज धर्मेंद्र (Dharmendra) यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन झालं. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यावर त्यांच्या राहत्या घरीच उपचार सुरू होते. अखेर त्यांनी सोमवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. तब्बल सहा दशकं बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या सुपरस्टारचं निधन झाल्यामुळे सिनेसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावलेली. अगदी कडेकोट बंदोबस्तात धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अशातच मराठमोळे अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करुन धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच, त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना धर्मेंद्र यांच्यासोबतच्या काही आठवणीही सांगितल्या आहेत. 

Continues below advertisement

सचिन पिळगांवकरांची धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहणारी पोस्ट (Sachin Pilgaonkar Talks On Dharmendra)

मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर करत 'धरमजीं'ना श्रद्धांजली अर्पण केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी धर्मेंद्र यांचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यापैकी दोन फोटोंमध्ये धर्मेंद्र आणि सचिन पिळगांवकर एकत्र दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना सचिन पिळगांवकरांनी लिहिलंय की, "सर्वांत देखणे, दिग्गज धरमजी आपल्याला सोडून गेले; पण त्यांचा वारसा कायमच राहील, मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली यासाठी कृतज्ञ आहे. ही-मॅन (He-Man) आपल्या हृदयात कायमच जिवंत राहतील. "ओम शांती", असं म्हणत सचिन पिळगांवकरांनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सचिन पिळगांवकरांनी सांगितला धर्मेंद्र यांच्यासोबतचा 'तो' किस्सा 

ईटाइम्सशी बोलताा सचिन पिळगांवकर यांनी धर्मेंद्र यांच्याविषयी खास आठवणी सांगितल्या. सचिन पिळगांवकर म्हणाले की, "धरमजी हे केवळ सर्वात देखणे अभिनेते नव्हते तर मी भेटलेल्या सर्वात नम्र व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. मी त्यांच्यासोबत पहिल्यांदा काम केले तेव्हा मी फक्त नऊ वर्षांचा होतो. हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित 'मझली दीदी' (1967) या चित्रपटात मी मीना कुमारीजींच्या धाकट्या भावाची भूमिका केली होती आणि धरमजींनी त्यांच्या पतीची भूमिका साकारली होती. धरमजी हृषिदा यांना कधीही नकार देऊ शकत नसल्यामुळे, त्यांनी ती मर्यादित महत्व असणारी भूमिकाही स्वीकारली होती. मला आठवते की सेटवर हा अविश्वसनीय देखणा माणूस मी पाहिला होता, जे केवळ सहकाऱ्यांशीच नव्हे तर सेटवरील प्रत्येक तंत्रज्ञाशी सौम्य आणि आदराने बोलायचे."

Continues below advertisement

सचिन पिळगांवकर पुढे म्हणाले की, ''रेशम की डोरी' (1974) मध्ये मी धरमजी यांची तारुण्यातील भूमिका साकारलेली. त्यानंतर आम्ही 'शोले'मध्ये एकत्र काम केले, नंतर 'दिल का हीरा'मध्ये त्यांनी कस्टम अधिकाऱ्याची भूमिका केली होती आणि मी त्यांच्या धाकट्या भावाच्या भूमिकेत होतो. तोपर्यंत आमची मैत्री झाली होती, आम्ही 'क्रोधी'मध्येही काम केले. अनेक वर्षांनंतर, 'आजमयिश'साठी त्यांना दिग्दर्शित करणे हे माझे भाग्य आणि सन्मान होता. दिग्दर्शक म्हणून, मला माझे सर्व कलाकार आवडतात, परंतु धरमजींना दिग्दर्शित करणे खूपच खास होते.'

"यमला पगला दिवाना हे शिर्षक माझ्याकडे होतं, मग धर्मेंद्रंनी फोन केला अन्..."

धर्मेंद्र यांच्याबाबतच एक किस्सा सांगताना सचिन पिळगांवकर म्हणाले की, "मी 90 च्या दशकाच्या उत्तरार्धातील एक किस्सा सांगू इच्छितो. मी 'यमला पगला दीवाना' हे चित्रपटाचं शीर्षक 'इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन'कडे नोंदवलेलं. एक दिवस एका निर्मात्यानं मला फोन करून शीर्षक त्यांना देण्याविषयी विचारलं, पण मी नकार दिला... काही दिवसांनी, मला स्वतः धरमजींचा फोन आला. मी त्यांना विचारलं की, "कसे आहात धरमजी?" त्यानंतर खूपच सौम्यतेनं माझ्याशी बोलले. मग पुढे बोलताना त्यांनी मला विचारलं की, "सचिन, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होते... तुमच्याकडे 'यमला पगला दीवाना' हे चित्रपटाचं शीर्षक आहे. मी म्हटले की, "नाही, ते आता माझ्याकडे नाहीय...' धरमजी शांतपणे हसले आणि पुढे म्हणाले, "पण निर्मात्यानं मला सांगितलंय की, तुम्ही त्यांना नकार दिला.' मी त्यांना म्हणालो की, 'ते शीर्षक फक्त तोपर्यंतच माझं होतं, जोपर्यंत तुम्ही ते मागितलेलं नव्हतं... आता ते माझं राहिलेलं नाही, ते तुमचंच आहे." मी त्यांना पुढे बोलताना आणखी काही हवंय का, असं विचारलं. कारण ज्या माणसानं भारतीय चित्रपटसृष्टीला इतकं काही दिलंय, त्यांची परतफेड आपण कशी करणार? त्यांचा वारसा नेहमीच सर्वोच्च राहील..."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

धर्मेंद्रचं निधन, अंत्ययात्रा ते सनी देओलकडून मुखाग्नी, अर्ध्या तासात 'ही मॅन'ला निरोप, पवनहंस स्मशानभूमीत काय काय घडलं?