Dharmendra Most Handsome Man In The World: सिनेसृष्टीवर तब्बल सहा दशकं राज्य करणाऱ्या धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला आणि अवघी सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली. जुहू येथील आपल्या राहत्या घरी धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं जाणं देशभरातील त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या मनाला चटका लावणारं आहे. एकदम झोकात पडद्यावर एन्ट्री घेणारा 'ही-मॅन' आजही लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत होता.
धर्मेंद्र यांना त्यांची प्रभावी शरीरयष्टी आणि अॅक्शन-मॅन व्यक्तिरेखेसाठी बॉलिवूडचा 'ही-मॅन' म्हणून ओळखलं जातं. पण, फारच कमी लोकांना माहीत आहे की, त्यांनी त्यांच्या सिनेक्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात एक रोमँटिक स्टार म्हणून केली. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात, 60 आणि 70 च्या दशकाच्या सुरुवातीला, त्यांना उद्योगातील सर्वात सुंदर अभिनेत्यांपैकी एक मानलं जायचं. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी या दाव्याला आणखी बळकटी दिली, ज्यामुळे त्यांना 'जगातील सर्वात देखणा पुरूष' (Most Handsome Man In The World) म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
...जेव्हा धर्मेंद्र यांना जगातील सर्वात हँडसम व्यक्ती म्हटलं गेलं
धर्मेंद्र यांनी आपल्या करियरची सुरुवात अनेक रोमँटिक आणि ड्रामा फिल्म्समधून केली. धर्मेंद्र यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात 'अनुपमा' (1969), 'बहरें फिर भी आयेंगी' (1966), 'काजल' (1965) आणि 'मेरा गाव मेरा देश' (1971) यासारख्या अनेक रोमँटिक चित्रपटांमध्ये काम करून केली, ज्यामुळे त्यांची रोमँटिक अभिनेता म्हणून ओळख बनली. मीना कुमारी यांच्यासोबतची त्यांची जोडी विशेष लोकप्रिय ठरली. 1970 च्या दशकापर्यंत, धर्मेंद्र यांनी अखेर इंडस्ट्रीमध्ये आपले पाय रोवले आणि लिडिंग मॅन म्हणून स्वतःला प्रस्थापित केलं.
त्याकाळत फक्त भारतातच नाहीतर संपूर्ण जगभरातील मासिकांमध्ये धर्मेंद्र यांची दखल घेतली गेली. 1970 च्या दशकात, आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्सनी जगातील टॉप 10 आणि टॉप 5 सर्वात देखण्या पुरुषांमध्ये धर्मेंद्र यांना स्थान दिलं. तर, काही मासिकांनी तर धर्मेंद्र यांचा उल्लेख 'जगातील सर्वात देखणा पुरूष' असा केलेला.
जेव्हा धर्मेंद्रंशी केलेली हॉलिवूड स्टार्सची तुलना
धर्मेंद्र यांनी स्वतः एका मुलाखतीत बोलताना सांगितलेलं की, एक काळ होता, ज्यावेळी त्यांची तुलना त्यावेळच्या 'हॉलीवुड हार्टथ्रोब', सारख्या जेम्स डीन आणि पॉल न्यूमॅनशी केलेली. लेहरेन रेट्रोला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत बोलताना त्यांनी सांगितलेलं की, "काही लोकांनी माझी तुलना एका हॉलिवूड स्टारशी केलेली, पण मी त्याचा एकही सिनेमा पाहिलेला नव्हता... मग मी गेलो आणि त्याचे सिनेमे पाहिले आणि मग मलाही असं वाटलं की, कदाचित एका बाजूनं मी थोडासा त्यांच्यासारखा दिसतोय. मग मलाही स्वतःलाही असंच काहीसं वाटू लागलेलं..."