Dharmendra Last Phone Call: बॉलिवूडचे (Bollywood News) दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तब्बल सहा दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे धर्मेंद्र यांच्या जाण्यानं मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बॉलिवूडचे (Bollywood) 'ही-मॅन' (He Man) म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी आजवर अनेक सिनेमांमध्ये काम केलंय. कित्येक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. जुहूमधील आपल्या राहत्या घरी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं अख्खा देश शोकसागरात बुडाला आहे. अशातच, अभिनेता निकितिन धीर यानं एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता निकितिन धीरचे वडील दिग्गज अभिनेते पंकज धीर यांचं 15 ऑक्टोबर रोजी निधन झालंय. त्या कठिण काळात धर्मेंद्र स्वतः आयसीयूमध्ये दाखल होते. पण, स्वतः आजारी असूनही त्यांनी पंकज धीर यांच्या पत्नीला स्वतः फोन केला आणि फोनवरुन त्यांचं सांत्वन केलं.
धर्मेंद्र फोनवर काय म्हणाले?
फोनवर धर्मेंद्र यांनी पंकज धीर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबाला धीर दिला. धर्मेंद्र म्हणाले की, "काळजी करू नका, मी लवकरच बरा होईन आणि घरी परत येईन..." इतक्या गंभीर अवस्थेतही ते इतरांच्या दुःखाला स्वतःचं दुःख समजत होते, हे ऐकून संपूर्ण कुटुंब हैराण झालेलं. निकितन धीर यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी इंस्टाग्रामवर धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहणारी एक लांबलचक पोस्ट लिहिलीय.
धर्मेंद्र यांच्याबाबत निकितन धीर काय म्हणाला? (Nikitin Dheer On Dharmendra)
निकितन धीर पुढे बोलताना म्हणाला की, "माझे बाबा आणि मी अनेकदा आपल्या चित्रपटसृष्टीतील आजपर्यंतचा सर्वात यशस्वी नायक कोण आहे? याबद्दल बोलायचो, ते एका क्षणाचाही विलंब न लावता म्हणायचे, धरम अंकल... ते नेहमी म्हणायचे, सर्वात मर्दानी, सर्वात देखणा, सर्वात नम्र आणि उदार माणूस... एकदम ओरिजिनल... धरम अंकल... जेव्हा माझे बाबा गेले, तेव्हा धरम अंकलनी माझ्या आईला आयसीयूमधून फोन केला आणि त्यांचं प्रेम आणि सांत्वन व्यक्त केलं आणि आईला सांगितलं की, ते लवकरच घरी परत येतील, काळजी करू नका..."
89व्या वर्षी धर्मेंद्र यांनी घेतला अखेरचा श्वास
निकितन धीरनं पोस्टमध्ये बोलताना पुढे लिहिलंय की, "त्यांचं जाणं हे एक वैयक्तिक नुकसान आहे. आम्ही त्यांच्या कुशीत वाढलोय... त्यांच्याकडून आम्हाला फक्त प्रेम आणि आशीर्वाद मिळाले. आम्ही नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहिलंय, त्यानं ते जिथे असतील ते वातावरणंही अगदी उत्साही व्हायचं... आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी त्यांचे हात नेहमीच तयार असायचे. चित्रपटसृष्टीतील तुमच्या अमूल्य योगदानाबद्दल धन्यवाद. आमचं बालपण आनंदानं भरल्याबद्दल धन्यवाद... एक माणूस काय असू शकतो आणि एखाद्या माणसानं काय असावं? हे आम्हाला दाखवल्याबद्दल धन्यवाद... तुम्ही सोडून गेल्यामुळे निर्माण झालेली पोकळी कोणीही भरून काढू शकत नाही. दुसरा धर्मेंद्र कधीही येणार नाही. संपूर्ण कुटुंबाला माझ्या मनापासून संवेदना..."
दरम्यान, धर्मेंद्रजी बऱ्याच काळापासून आजारी होते. त्यांना 31 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. 12 नोव्हेंबर रोजी डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला आणि ते घरीच उपचार घेत होते. पण 24 नोव्हेंबर रोजी ते आम्हाला कायमचे सोडून गेले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :