मुंबई : झी मराठीवर चांगलीच पसंतीस पडलेली देवमाणूस ही मालिका नुकतीच संपली. या मालिकेत खास लक्ष वेधून घेतलं ते भैय्यासाहेब अर्थात डॉक्टरनं. ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेता किरण गायकवाडनं आज फेसबुक पोस्ट करत सर्वांचे आभार मानले आहेत. 


तो फेसबुक पोस्टमध्ये म्हणतोय की,  मी खुप दिवस झाले हा विचार करतोय की पोस्ट लिहावी पण शब्द नव्हते. आज लिहुनच टाकलं देवमाणूस सीरियल बघता बघता संपली.  खरंतर कुठलाही प्रोजेक्ट तेव्हाच चांगला होतो जेव्हा सगळे जीव तोडून काम करत असतात माझे सहकलाकार, सर्व तंत्रज्ञ, प्रॉडक्शन टीम, हेअर आणि मेकअप डिपार्टमेंट  ते स्पॉट दादांपर्यंत साऱ्यांनी हातभार लावला, असं किरणनं म्हटलं आहे. 



किरण म्हणतो की,  देवमाणुसच्या सेटवरचा प्रत्येक माणूस जीव तोडून काम करत होता त्याबदल वादच नाही. कारण रात्री साडे दहा वाजता प्रदर्शित होणाऱ्या आजवरच्या मालिकांचे टीआरपी रेकॉर्डस देवमाणसूने मोडले. टीआरपीचे रेकॉर्डस नक्कीच आनंद देतात पण त्यापेक्षाही घराघरातले छोट्यामोठ्यांनी मोठे रात्री जागनू न चुकता देवमाणूस मालिका पाहिली. 


'या डॉक्टरला लई हानला पाहेन', 'ह्यों कसला डॉक्टर शैतान हाय ह्यो'  मी म्हणतो हीच खरी माझ्या कामाची पावती आहे. हा प्रवास खरंच सोपा नव्हता. इतक्या गंभीर विषयाला अत्यंत सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडताना मनात साशंकता नक्कीच होती. पण जशी कागदावर गोष्ट आणणं. पात्र आकार घेऊ लागली तशा या शंका मनातून दूर  झाल्या, असं त्यानं म्हटलं आहे. 


काय म्हणाल्या निर्मात्या 


मालिका संपल्यानंतर या मालिकेच्या निर्मात्या श्वेता शिंदे यांनीही पोस्ट लिहित सर्वांचे आभार मानले होते. आपल्या सर्वांची लाडकी मालिका “देवमाणूस “आज आपला निरोप घेते आहे. झी मराठी वाहिनीनी ही संधी आम्हास दिली त्यासाठी आम्ही त्यांचे नेहमीच ऋणी राहू. लवकरच आणखीन काहीतरी खास घेऊन तुमच्या मनोरंजनास सज्ज असू, पण तोपर्यंत तुमचं असंच प्रेम आमच्या पाठीशी राहुद्या, हीच नम्र विनंती’, असं श्वेता शिंदे यांनी म्हटलं होतं.