झी मराठीवर रात्री साडेदहा वाजले की प्रत्येकाला देवीसिंग आठवत होता. खरंतर जनसामान्यांसाठी देवाचा अवतार असतो तो डॉक्टर. पण या डॉक्टरच्या बनावट रुपात अवतरला होता देवीसिंग. हा देवीसिंग आणि त्याची कटकारस्थानं देवमाणूस या मालिकेतून दिसत होती. देवीसिंगच्या मागावर असणारी कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी दिव्या सिंग आणि देवीसिंगची जुगलबंदी रसिकांना भावली. पण आता हा देवीसिंग निरोप घेणार आहे.
रात्री साडेदहाच्या वेळेस देवमाणूसचा टायटल ट्रॅक ऐकणं नित्यनेमाचं झालं होतं. आता मी मालिका संपतेय. येत्या 14 ऑगस्टला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. त्यानंतर तिथे नवी मालिका येणार आहे. या मालिकेचं नाव आहे ती परत आलीये. या मालिकेचे प्रोमोही आता टीव्हीवर दिसू लागले आहेत. या पहिल्या प्रोमोमध्ये अभिनेते विजय कदम दिसतात. ते रात्रीची गस्त घालताना दिसतायत. पण पुढे या मालिकेत काय असणार आहे ते मात्र दिलेलं नाही. विजय कदम बऱ्याच कालावधीनंतर छोट्या पडद्यावर दिसताहेत. बऱ्याच काळानंतर आलेल्या या अनुभवाबद्दल बोलताना विजय कदम म्हणाले, मी खूप काळानंतर मालिका करतो आहे. माझ्यासाठी हा अनुभव आनंददायी असेल. माझी एकंदर व्यक्तिरेखा काय आहे, ते मला आत्ता सांगता येणार नाही. पण माझ्या व्यक्तिरेखेवर महाराष्ट्र प्रेम करेल हे नक्की.
ती परत आलीये ही गूढ मालिका असणार आहे हे या मालिकेच्या प्रोमोवरून लक्षात आलं आहे. मुळात देवमाणूस ही मालिकाही गूढ होती. त्याहीपेक्षा त्यामध्ये तपास आणि थरार होता. आता तोच धागा नव्या मालिकेत पकडायचा वाहिनीचा प्रयत्न दिसतो आहे. साडेदहाच्या स्लॉटमध्ये ती परत आलीये ही मालिका 16 ऑगस्टपासून सुरू होईल. तर लगेच 11 वाजता रात्रीस खेळ चाले 3 ही मालिकाही असणार आहे. अर्थात सध्या लॉकडाऊनमुळे या मालिकेच्या चित्रिकरणात खंड पडला आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांत रात्रीस खेळ चाले या मालिकेचं चित्रिकरण सुरू होईल. त्यानंतर ही मालिका पुन्हा एकदा झी मराठीवर दिसणार आहे.
देवमाणूस ही मालिका सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच ती लोकप्रिय झाली. देवीसिंगचा कुटील हेतू आणि त्याच्या मागावर असणारी दिव्या सिंग ही केमिस्ट्री चालून गेली. म्हणूनच या मालिकेने आजवर जवळपास 280 भाग पूर्ण केले आहेत. आणखी साधारण 20 दिवसांनी ही मालिका निरोप घेणार आहे. त्यानंतर ती परत आलीये या मालिकेत कोण कोण असणार आहे, विजय कदम यांच्या सोबतीला नवे कलाकार असतील की आणखी जुने कोणी असतील, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण छोट्या पडद्यावर आणखी एक काहीतरी गूढ रंजक अवतरणार आहे.