Deepika padukone: प्रभासच्या बहुचर्चित ‘स्पिरिट’ या चित्रपटातून अभिनेत्री दीपिका पादुकोण बाहेर पडल्यानंतर सुरू झालेला वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याआधी दीपिकाने दिवसाला केवळ 8 तास काम करण्याची अट ठेवल्यामुळे तिने चित्रपट सोडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता चित्रपटाचे निर्माते प्रणय रेड्डी वांगा यांनी या प्रकरणाबाबत काही नवे दावे केले आहेत.
दीपिकाने प्रॉफिटमध्ये 10 टक्के हिस्सा मागितला?
दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचे भाऊ आणि ‘स्पिरिट’चे निर्माते प्रणय रेड्डी वांगा यांनी एका मुलाखतीत दीपिकासोबत जवळपास दीड वर्ष चर्चा सुरू असल्याचं सांगितलं. संदीप रेड्डी वांगा यांना दीपिकाला या चित्रपटात घेण्याची इच्छा होती. मात्र, अखेरीस दोन्ही बाजूंमध्ये काही अटींवर एकमत होऊ शकलं नाही.
प्रणय यांच्या दाव्यानुसार, दीपिकाने केवळ अभिनयाच्या मानधनावर चर्चा न करता चित्रपटाच्या नफ्यातून 10 टक्के हिस्सा मागितला होता. त्याशिवाय मानधन आणि शूटिंगच्या वेळेबाबतही काही मुद्द्यांवर मतभेद होते.
प्रणय रेड्डी वांगा यांनी सांगितलं की, हा प्रश्न केवळ दीपिकाच्या फीमध्ये 5 ते 6 कोटी रुपये वाढ करण्यापुरता मर्यादित नव्हता. चित्रपटाच्या एकूण बजेटचा विचार करता या आर्थिक अटी निर्मात्यांना मान्य नव्हत्या, असा त्यांचा दावा आहे.
‘कथेची माहिती लीक झाल्याचा’ आरोप
या प्रकरणात आणखी एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. प्रणय रेड्डी वांगा यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा निर्मात्यांनी या भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्रीचा विचार करण्यास सुरुवात केली, तेव्हा ‘स्पिरिट’ची कथा आणि दीपिकाच्या व्यक्तिरेखेशी संबंधित काही माहिती बाहेर येऊ लागली.
निर्मात्यांचा आरोप आहे की, दीपिकासोबत कथेची आणि तिच्या भूमिकेची माहिती शेअर करण्यात आली होती. ही अंतर्गत माहिती सार्वजनिक होऊ नये, अशी अपेक्षा होती. मात्र, ती माहिती लीक झाल्याचा दावा प्रणय यांनी केला आहे. मात्र, या आरोपांवर दीपिका पादुकोणकडून अद्याप कोणती प्रतिक्रिया आलेली नाही.
‘स्पिरिट’मध्ये कोण दिसणार?
‘स्पिरिट’चं दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा करत आहेत. या चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या देसाई यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.हा चित्रपट आठ भाषांमध्ये प्रदर्शित करण्याची योजना असून, सध्या ‘स्पिरिट’ 5 मार्च 2027 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
