De Dhakka 2 : महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘दे धक्का 2’ या चित्रपटाचा भन्नाट टीझर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदा जाधवांची स्वारी थेट लंडनमध्ये दाखल होणार आहे. ‘दे धक्का 2’ या चित्रपटासाठी चाहते फारच आतूर झाले आहेत. ‘दे धक्का 2’ हा ‘दे धक्का’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. पहिल्या चित्रपट ज्याप्रमाणे धम्माल आणि तितकाच काळजाला हात घालणारा होता, त्याप्रमाणे ‘दे धक्का 2’ चित्रपटाकडून चाहत्यांना फार अपेक्षा आहेत. ‘दे धक्का 2’ चित्रपट 05 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.


‘दे धक्का 2’ चित्रपटाचा नुकताच प्रदर्शित झालेला टीझर पाहून हा चित्रपट प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करणारा ठरेल, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ‘दे धक्का 2’ चित्रपटात सर्वाचा मॉर्डन अवतार पाहायला मिळणार आहे. अभिनेता मकरंद अनासपुरे आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव या हास्यवीरांची जोरी हसवून हसवून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणेल एवढं नक्की. चित्रपटाच्या पोस्टर रिलीजपासून चाहत्यांना या चित्रपटाची उत्कंठा लागली आहे.



पुन्हा एकदा दिसणार कलाकारांची धमाल!


‘दे धक्का 2’ या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या बॅनर खाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘दे धक्का 2’च्या टीझरमुळे प्रेक्षकही उत्सुक झाले असून, त्यांच्या लाडक्या मकरंद जाधव, सुमती जाधव,  धनाजी, सूर्यभान जाधव, सायली आणि किसनाला भेटण्यासाठी उत्सुक आहेत.


‘दे धक्का’ हा चित्रपट 2008साली चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. अनेकदा चित्रपटगृहाबाहेर हाऊसफुलचे बोर्ड लागलेले दिसून आले होते. ‘दे धक्का’मध्ये शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, मेधा मांजरेकर, गौरी वैद्य, सचित पाटील या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाचा पहिला भाग अतुल काळे आणि सुदेश मांजरेकरांनी दिग्दर्शित केला होता. तर, महेश मांजरेकरांनी या चित्रपटाचे लेखन केले होते.


यंदा होणार थेट ‘लंडन’वारी!


यावेळेस ही धमाल ट्रीप मुंबई-कोल्हापूर नाही तर, कोल्हापूर ते थेट लंडन असणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. पोस्टरमध्ये लंडनची झलक पाहून यंदा धमाल आणि मनोरंजनाचा मोठा डोस प्रेक्षकांना मिळणार आहे, हे लक्षात येते.