De Dhakka 2 : अभिनेते मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure), शिवाजी साटम (Shivaji Satam), सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) यांच्या बहारदार विनोदाने सजलेल्या ‘दे धक्का’ (De Dhakka) या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले होते. या चित्रपटाला आजही प्रेक्षकांच्या आवडत्या चित्रपटांच्या यादीत स्थान आहे. या चित्रपटाच्या सिक्वेलची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, कोरोनामुळे चित्रपटात खंड पडला होता. आता चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘दे धक्का 2’ (De dhakka 2) या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
‘थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय, घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय...’, म्हणत हा धमाल टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या टीझरमध्ये पुन्हा एकदा सगळ्या जुन्या पात्रांची झलक दिसत आहे. पण, यावेळी काळ्या-पिवळ्या टमटमऐवजी कार दिसणार आहे. आता ही गाडी प्रेक्षकांना किती हसवणार हे लवकरच कळणार आहे. हा चित्रपट 5 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
पाहा टीझर :
पुन्हा एकदा दिसणार कलाकारांची धमाल!
‘दे धक्का 2’ या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या बॅनर खाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘दे धक्का 2’च्या टीझरमुळे प्रेक्षकही उत्सुक झाले असून, त्यांच्या लाडक्या मकरंद जाधव, सुमती जाधव, धनाजी, सूर्यभान जाधव, सायली आणि किसनाला भेटण्यासाठी उत्सुक आहेत.
‘दे धक्का’ हा चित्रपट 2008साली चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. अनेकदा चित्रपटगृहाबाहेर हाऊसफुलचे बोर्ड लागलेले दिसून आले होते. ‘दे धक्का’मध्ये शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, मेधा मांजरेकर, गौरी वैद्य, सचित पाटील या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाचा पहिला भाग अतुल काळे आणि सुदेश मांजरेकरांनी दिग्दर्शित केला होता. तर, महेश मांजरेकरांनी या चित्रपटाचे लेखन केले होते.
यंदा होणार थेट ‘लंडन’वारी!
यावेळेस ही धमाल ट्रीप मुंबई-कोल्हापूर नाही तर, कोल्हापूर ते थेट लंडन असणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. पोस्टरमध्ये लंडनची झलक पाहून यंदा धमाल आणि मनोरंजनाचा मोठा डोस प्रेक्षकांना मिळणार आहे, हे लक्षात येते.
हेही वाचा :
Hemangi Kavi : 'वडाच्या झाडाला दोरा गुंडाळण्यापेक्षा...'; हेमांगीची पोस्ट पुन्हा चर्चेत