Priyadarshini Indalkar:महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमामुळे प्रियदर्शनी घराघरात लोकप्रिय झाली. पुढे तिने ‘दशावतार’सारख्या गाजलेल्या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत मोठ्या पडद्यावर आपली छाप उमटवली. दशावतार नंतर ती आता एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. ' लग्नाचा शॉट' असं या सिनेमाचं नाव आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती विविध मुलाखती देत आहे. याच दरम्यान एका पॉडकास्टमध्ये बोलताना तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी, लग्न आणि नातेसंबंध बद्दल स्पष्ट भूमिका मांडली आहे. काही दिवसांपूर्वी प्रियदर्शनीने तिच्या ब्रेकअपविषयी सांगितलं होतं. आता ओपन मॅरेज बद्दल तिने भाष्य केलं आहे.

Continues below advertisement

काय म्हणाली प्रियदर्शनी?

लग्नाबाबत विचारले असता प्रियदर्शिनी म्हणाली की, सध्या लग्न करण्याचा कोणताही विचार तिच्या मनात नाही. “लग्नाचा निर्णय सहज घेता येत नाही. आधी प्रेम, समजूतदारपणा आणि एकमेकांशी जुळवून घेणं आवश्यक असतं. त्या सगळ्या टप्प्यांमधून गेल्यानंतरच लग्नाचा विचार करता येतो,” असं ती म्हणाली. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज या प्रश्नावर तिने सध्या तरी प्रेमविवाहाचीच शक्यता जास्त असल्याचं सांगितलं, मात्र भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही, असंही ती म्हणाली.

ओपन मॅरेजबाबत बोलताना प्रियदर्शिनीने स्पष्ट मत मांडलं. “समाजात अशा नात्यांबद्दल माझा कोणताही आक्षेप नाही. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. मात्र, स्वतःसाठी असा विचार करणं मला शक्य वाटत नाही,” असं तिने सांगितलं. बदलत्या काळात नात्यांच्या संकल्पना बदलत असल्या तरी काही गोष्टी सर्वांसाठी स्वीकारणं सोपं नसतं, असंही ती म्हणाली.

Continues below advertisement

प्रेमाविषयी द्विधा मनस्थितीत...

ती पुढे म्हणाली," आज सोशल मीडियावर दहा पोस्ट पाहिला तर एक पोस्ट म्हणते प्रेम सगळं काही आहे. तर दुसरी पोस्ट म्हणते प्रेमात आंधळे होऊ नका करिअरवर लक्ष द्या. पुढची पोस्ट म्हणते आत्मसन्मान महत्त्वाचा आहे. प्रेम वगैरे सगळं नंतर. मग लगेच एखादी कॉमेडी रील दिसते. कपल्सचे सुंदर फोटो पाहून आपल्यालाही असा पार्टनर हवा असं वाटतं. एवढी स्वप्न दाखवणाऱ्या सोशल मीडियात एक खोटं जग आपल्यासमोर उभे राहत असतं. त्यामुळे लग्नाचा निर्णय घेणं आता आणखी कठीण झाला आहे .ती पुढे म्हणाली तुम्ही जर वयाची तिशी ओलांडली असेल आणि अविवाहित असाल तर तुम्ही एक घटस्फोट चुकवला आहे . ही खूप भयानक परिस्थिती आहे.पण तरीही प्रेम लग्न याबद्दल मी अजूनही आशावादी आहे. मला लग्न करायचंय पण एकंदर सगळी परिस्थिती पाहता विधा मनस्थिती कायम आहे. असं प्रियदर्शनी म्हणाली.

दरम्यान, प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिजित आमकर मुख्य भूमिकेत असलेला ‘लग्नाचा शॉट’ हा चित्रपट 6 फेब्रुवारी 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.