Coldplay Concert Ticket Sales Controvercy : सध्या भारतात 'कोल्डप्ले'च्या (Coldplay Concert) नावानं धुमाकूळ घातला आहे. 'कोल्डप्ले' हा जगभरात गाजलेला एक प्रसिद्ध रॉक बँड (Famous Rock Bands Coldplay) आहे. येत्या काही आठवड्यांत या प्रसिद्ध बँडची कॉन्सर्ट मुंबईत होणार आहे. पण, गेल्या कित्येक महिन्यांपासून मुंबई सोडा, तर देशभरातील तरुणाईमध्ये 'कोल्डप्ले'च्या चर्चा आहेत. 'कोल्डप्ले'ची क्रेझ एवढी की, तिकीटं विकणारी साईट सुरू होताच, अवघ्या काही मिनिटांतच साईट क्रॅश झाली. फक्त आणि फक्त 30 मिनिटांत या ब्रिटिश रॉक बँडच्या कॉन्सर्टची सर्व तिकिटं विकली गेली. तर, अजुनही 99 लाख लोक तिकिटांच्या वेटिंग लिस्टमध्ये आहेत.काही हजार किमतींची तिकीट दहा लाख रुपयांना ब्लॅकनं विकली जात आहे. यासंदर्भात हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे, त्यावर हायकोर्टात गुरुवारी सुनावणी पार पडली.
नवी मुंबईतील कोल्डप्ले कॉन्सर्टच्या बुकमायशो आणि इतर प्रवर्तकांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करणाऱ्या वकिलांनी दाखल केलेल्या जनहित याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयानं गुरुवारी आपला आदेश राखून ठेवला. या जनहित याचिकेत केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला तिकीटांचा सुरू असलेला काळाबाजार रोखण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वं तयार करण्यासाठी निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती.
दोन आठवड्यांनी नवी मुंबईत प्रसिद्ध ब्रिटीश बँड कोल्डप्लेची कॉन्सर्ट होणार आहे. ब्रिटीश बँड कोल्डप्लेच्या बहुप्रतीक्षित अखेरच्या वर्ल्ड टूरचं आयोजन पहिल्यांदाच नवी मुंबईत करण्यात आलं आहे. या कॉन्सर्टच्या ऑनलाईन तिकीट विक्रीत काळाबाजार झाल्याचा आरोप करत दाखल जनहित याचिकेवर हायकोर्टानं आपला अंतिम निकाल राखून ठेवला आहे.
कोर्टात नेमकं काय झालं?
कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकीट विक्रीत अनियमितता झाल्याचं तपासात उघडकीस आलं होतं. त्यावरून वादंग निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अॅड. अमित व्यास यांनी हायकोर्टात ही जनहित याचिका दाखल केली. गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी पार पडली. यावेळी याचिकाकर्त्यांच्यावतीनं ज्येष्ठ वकील जनक द्वारकादास यांनी कोर्टाला सांगितलं की, राज्य सरकारनं कार्यक्रमाच्या आयोजकांकडून करमणूक कर आकारलेला आहे. त्यामुळे तिकीटांची काळ्या बाजारात विक्री होणार नाही, याची काळजी घेणं हे राज्य सरकारचं कर्तव्य आहे.
लाईव्ह शो, कॉन्सर्टसारख्या मोठ्या इव्हेंटच्या ऑनलाईन तिकीट विक्रीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्वं आखण्यात यावीत, अशी विनंती त्यांनी हायकोर्टाला केली आहे. याची दखल घेत हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना राज्य सरकारकडे आपलं म्हणणं मांडण्याची सूचना केली आहे.
भारतात 'कोल्डप्ले'ची एवढी क्रेझ का?
कोल्डप्ले बँड 2022 पासून म्युझिक ऑफ इंडिया या नावानं वर्ल्ड टूर करत आहे. कोल्डप्ले बँडनं भारताचाही जागतिक दौऱ्यात समावेश केला आहे. ही कॉन्सर्ट पुढील वर्षी जानेवारीत होणार होती, मात्र 22 सप्टेंबरला दुपारी 12 वाजल्यानंतर तिकीट विक्री सुरू करण्यात आली. तिकीटावरून अशी मारामारी झाली की, मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू झाला. काही हजारांची तिकीटं लाखोंमध्ये विकली जाऊ लागली. कोल्डप्ले बँड नऊ वर्षांनंतर भारतात कॉन्सर्ट सादर करणार आहे. त्यांचा लाईव्ह परफॉर्मन्स पाहण्यासाठी लोकांची उत्कंठा इतकी जबरदस्त होती की, सर्व रेकॉर्ड मोडले गेले. आपल्या आवडत्या बँडची तिकिटं न मिळाल्यानं अनेकांची निराशा झाली आहे.