Chinmay Mandlekar : अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्याच्या अनेक भूमिका विशेष करुन छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करते. मालिकाविश्व, सिनेमा आणि रंगभूमीवर अशा प्रत्येक माध्यमांवर छाप पाडलेला चिन्मय मागील काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. चिन्मयला मुलाचं नाव जहांगीर ठेवलं म्हणून चांगलच ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर त्याने महाराजांची भूमिका कधीही न करण्याचा निर्णय घेतला. 


इतक्या सगळ्या भूमिका वठवणाऱ्या चिन्मयची सुरुवात ही एनएसडीपासून झाली. या दरम्यानचे अनेक किस्से चिन्मयने नुकत्याच झालेल्या सौमित्र पोटे यांच्या मित्र म्हणे या पॉडकास्टमध्ये सांगितले. यावेळी त्याने रजनीकांत यांना भेटलेला किस्सा देखील शेअर केलाय. रजनीकांत यांची भेट कशी झाली ते त्यांनी मराठी केलेलं संभाषण या सगळ्याविषयी चिन्मयने या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. 


रजनीकांत यांची भेट कशी झाली?


ज्यावेळी चिन्मय एनएसडीमध्ये दुसऱ्या वर्षाला होता, तेव्हा त्यांनी त्यांच्या नाटकाचा एक दौरा करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी कर्नाटक दौऱ्यामध्ये त्यांच्या नाटकांचा मैसूर येथे प्रयोग होता. त्यावेळी आशिष विद्यार्थी एका सिनेमाचं शूट करत होतं, याची माहिती मिळाली. तेव्हा चिन्मय आणि त्याचे बॅचमेट हे त्यांना भेटायला गेले. त्यांना भेटून चिन्मयने आणि त्याच्या मित्रांनी सांगितलं की नाटकासाठी म्हणून आम्ही सगळे आलो आहोत. तेव्हा आशिष विद्यार्थी म्हणाले माझं शूट आहे, पण मी तुमच्या नाटकाला येण्याचा प्रयत्न करेन. शूटबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी बाबा सिनेमाचं शूट चालू असून यामध्ये रजनीकांत आहेत, असं सांगितलं. यावर चिन्मय म्हणाला की, रजनीकांत या सिनेमात आहेत, हे एकून आमच्यासाठी आशिष विद्यार्थी हे बिनमहत्त्वाचे झाले, अशी मिश्लिक टीप्पणी त्याने केली. पुढे तो म्हणाला, त्यानंतर आम्ही आशिष सरांना विनंती केली आम्हाला रजनीकांत सरांना भेटायचं आहे. त्यावर ते म्हणाले ठिक आहे मी सांगतो म्हणून. तेव्हा आमच्याकडे पूर्ण बॅचमध्ये एकाकडे फोन होता. मग हो मोबाईल आमच्यासाठी जीव की प्राण झाला.


त्यांनी पाऊण तास आमच्याशी गप्पा मारल्या - चिन्मय मांडलेकर


 पहिल्यादिवशी त्यांनी फोन करुन आम्हाला बोलावून घेतलं. पण त्यावेळी कळलं की, काहीतरी गाडीतला सीन होता, तर त्यांना गाडीतून घेऊन गेलेत, आता त्यांना यायला वेळ लागेल. त्यानंतर आमचा शो होता, म्हणून मग आम्ही शोसाठी गेलो. तेव्हा आशिष सरांनी सांगितलं की मी तुम्हाला फोन करेन, कदाचित ते संध्याकाळी तुम्हाला लॉजवर भेटतील. तो शो संपेपर्यंत आम्हाला फोन आला आणि बोलावलं. त्यानंतर आम्ही भेटायला गेलो आणि एका अत्यंत साध्या हॉटेलसमोर गाडी थांबली. तेव्हा कळलं की, ते इथेच राहतात. कारण जिथे क्रू तिथे ते. आशिष सर होते आमच्याबरोबर. तेव्हा त्यांच्या मॅनेजरने सांगितलं की, फक्त पाच मिनिटं. एका माणसाने येऊन दार उघडलं आणि मी आतमध्ये त्यांना शोधत होतो. समोर टक्कल पडलेला, पांढरा शर्ट आणि लुंगी नेसलेला माणूस होता, पाहिलं तेव्हा कळलं की, तेच रजनीकांत सर आहेत. आत गेलो, गप्पा मारल्या. पाच मिनिटांनी मॅनेजर आला वेळ संपली सांगायला, तेव्हा त्यांनी त्याला माघारी पाठवून दिलं आणि आम्ही पाऊण सात गप्पा मारल्या. निघताना आम्ही प्रत्येकाने ओळख करुन दिली. मी सांगितलं, की मी चिन्मय मांडलेकर, मुंबई, महाराष्ट्र. तेव्हा ते म्हणाले, महाराष्ट्र का अरे व्हा व्हा. त्यांना फार येत नाही मराठी, पण ते तेवढं जुजबी बोलले माझ्याशी. त्यानंतर मी खूप रिस्क घेऊन त्यांना माझ्याकडचा गॉगल दिला आणि फक्त एकदा त्यांची स्टाईल करायला सांगितली जे त्यांनी केलं,  हा आयुष्यातील एक खास किस्सा चिन्मयने सांगितला. 


ही बातमी वाचा : 


Myra Vaikul:  'कोणत्याही मुलाला जज करणं...', चिमुकल्या मायराच्या बोलण्यावरुन ट्रोलिंगची लाट, वडीलांनीही दिलं चोख उत्तर