Myra Vaikul:  अवघ्या सात वर्षांची चिमुकली असलेली मायरा वायकुळ (Myra Vaikul) हिने अल्पावधीच प्रेक्षकांची मनं जिंकली. छोट्या पडद्यावरुन भेटीला आलेली छोटी मायरा आता मोठा पडदाही गाजवतेय. 'नाच गं घुमा' (Naach G Ghuma) या सिनेमातून मायरा प्रेक्षकांच्या भेटीला आलीये. या सिनेमाच्या निमित्ताने मायराने अनेक मुलाखती दिल्या. पण तिच्या मुलाखतीमधील तिची उत्तरं ही मात्र ट्रोलिंगचं कारण ठरलीत. पण हे ट्रोलिंग तिचं नाही झालं, तर या ट्रोलिंगला तिच्या आईवडिलांना सामोरं जावं लागलं आहे. 


मायरा ही तिच्या युट्युब व्लॉगमधून आणि इन्स्टाग्राम रिल्समुळे प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. सोशल मीडियावरही तिचे अनेक फॅन्स आहेत. मायराचं सोशल मीडिया अकाऊंट हे तिची आई श्वेता वायकुळ या हँडल करतात. दरम्यान मायराच्या अनेक पोस्टवरही अनेकजण कमेंट्स करत तिच्या आईवडिलांना खडेबोल सुनावतात. पण आता या सगळ्यावर मायराचे वडील गौरव वायकुळ यांनी भाष्य केलं आहे. 


कोणत्याही मुलाला जज करणं हे चुकीचं - गौरव वायकुळ (मायराचे वडील)


मायराने आणि तिच्या वडिलांनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी  या ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे. मायराच्या अनेक व्हिडिओवर कमेंट्स येतात की ती फार समजूतदार झालीये, या प्रश्नाचं उत्तर देताना मायराच्या वडिलांनी या सगळ्या ट्रोलिंगवर उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, माझ्यासाठी ती नकारत्मकता मॅटर करतच नाही. कारण तिथे 1000 कमेंट्स येतात. त्यातील 10 कमेंट्स या निगेटीव्ह असतात. पण माझ्यासाठी उरलेल्या कमेंट्स माझ्यासाठी जास्त महत्त्वाच्या आहेत. कारण तिच एक गोष्ट आपण चांगली मुलांना देऊ शकतो, मुलांना निगेटीव्हिटी आपण नाही दिली पाहिजे. प्रत्येकाला त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे. पण मायराच काय कोणत्याही मुलाला जज करणं हे चुकीचं आहे. कारण त्या गोष्टी जर त्या मुलांनी वाचल्या तर त्याचा कितपत परिणाम त्यांच्यावर होईल याची आपल्याला कल्पना नसते. मला आणि श्वेताला माहितेय तिला या पासून कसं लांब ठेवायचं. त्यामुळे आम्ही तिच्या पाठिशी आहोतच. 


आपण काळजी घेणं जास्त महत्त्वाचं - गौरव वायकुळ (मायराचे वडील)


तुम्हाला माहित नाही, कधी हे तिने वाचलं आणि त्याचा तिच्यावर काय परिणाम होईल. त्यामुळे एक जबाबदार नागरिक म्हणून आपण याची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं आहे. तिचं बोलणं, तिचं वागणं हे तिचं वैयक्तिक आयुष्य आहे. ती लहान मुलांसारखी पटकन बोलून जाते.तिला हे कधी कोणी शिकवलं नाही, तिला कोणी सांगितलं नाही, ते तिचं तिचं ती करतेय. त्यामुळे आपण यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टींवर जास्त फोकस करावा, असं मला नेहमी वाटतं. जेव्हा पण आपण कधी ट्रोल करतो, तेव्हा एक विचार आईवडिलांच्या मनात येतो की, आपण एवढं सगळं करतोय, पण लोकं काय बोलतायत. यामुळे कदाचित आम्ही तिला थांबवू पण यामध्ये तिचं टॅलेंट संपून जाईल. म्हणूनच आम्ही तिला कधीच कोणत्या कामासाठी जबरदस्ती नाही करत, आजही कोणतं नवं प्रोजेक्ट आलं की आम्ही तिला विचारतो, ती हो म्हणाली तरच आम्ही पुढे जातो, असं स्पष्टीकरण मायराच्या वडीलांनी दिलं. 


ही बातमी वाचा :


Myra Vaikul: 'हिचं लहानपण हरवलंय', अवघ्या 7 वर्षांच्या चिमुकलीचं बोलणं ऐकून नेटकरी बरसले; मायरा वायकुळचे आईवडिल झाले ट्रोल