Box Office Collection: सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office collection) हॉलिवूड चित्रपटांचा दबदबा पाहायला मिळत आहे. गेल्या दोन महिन्यांत हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपट प्रदर्शित झाले असले, तरी हॉलिवूडच्या चार मोठ्या चित्रपटांनी सगळ्यांच्याच कमाईवर मोठा परिणाम केला आहे. ( Hollywood movies) 

Continues below advertisement

खरंतर आजच्या काळात बॉक्स ऑफिसवर चित्रपटांची टक्कर ही नवी गोष्ट राहिलेली नाही. हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये अनेकदा संघर्ष पाहायला मिळतो. मात्र, यावेळी चित्र वेगळे आहे. गेल्या दोन महिन्यांत प्रदर्शित झालेल्या चार हॉलिवूड चित्रपटांनी केवळ दमदार कमाईच केली नाही, तर हिंदी आणि साऊथ चित्रपटांच्या कमाईलाही मोठा दणका दिला. 

'मायकल'मुळे 'भूत बंगला' आणि 'राजा शिवाजी'च्या कमाईला फटका

हॉलिवूडचा डान्सिंग स्टार मायकेल जॅक्सन यांच्या आयुष्यावर आधारित 'मायकल' हा चित्रपट 24 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी 'भूत बंगला' (182 कोटी नेट कलेक्शन) आणि 'राजा शिवाजी' (100 कोटी नेट कलेक्शन) हे चित्रपट चांगली कमाई करत होते. मात्र, 'मायकल' प्रदर्शित झाल्यानंतर या दोन्ही चित्रपटांच्या कमाईवर परिणाम झाल्याचं दिसून आलं.

Continues below advertisement

सॅकनिल्कच्या माहितीनुसार, 'मायकल'ने भारतात 71.09 कोटींचे नेट कलेक्शन केलं. तर जगभरात 9,050.36 कोटी आणि परदेशात 5,580 कोटींची कमाई केली.

'ऑब्सेशन'ने चार चित्रपटांची वाट अडवली

29 मे रोजी प्रदर्शित झालेल्या हॉलिवूडच्या हॉरर-ड्रामा 'ऑब्सेशन'नेही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्यानंतर 5 जूनला प्रदर्शित झालेले 'बंदर' (4.20 कोटी), 'मैं वापस आऊंगा' (65 कोटी), 'सिंग गीतम' (5.33 कोटी) आणि 'गव्हर्नर' (5.87 कोटी) या चित्रपटांच्या कमाईवर मोठा परिणाम झाला.यापैकी 'मैं वापस आऊंगा' हा चित्रपट सरासरी ठरला, तर उर्वरित चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले.

'ऑब्सेशन'ने भारतात 84.81 कोटींचं नेट कलेक्शन केलं. परदेशात 1,505 कोटी आणि जगभरात 3,851.05 कोटींची कमाई करत हा चित्रपट सर्वाधिक नफा कमावणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला.

'द ओडिसी'चा 'लेनिन' आणि 'धमाल 4'वर परिणाम

हॉलिवूडचा 'द ओडिसी' हा चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या चित्रपटामुळे हिंदीतील 'धमाल 4' आणि दक्षिणेतील 'लेनिन' या चित्रपटांच्या कमाईवरही परिणाम झाला. सॅकनिल्कनुसार, 'द ओडिसी'ने भारतात 135.25 कोटींचे नेट कलेक्शन केले. तर जगभरात 7,100 कोटी आणि परदेशात 3,900 कोटींची कमाई केली.

'धमाल 4'ने एकूण 155.85 कोटींची नेट कमाई केली असली, तरी 'द ओडिसी' प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या कमाईचा वेग मंदावला. दुसरीकडे 'लेनिन'ने 48.84 कोटींचे नेट कलेक्शन केले.

'स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे'ने 3 चित्रपटांचा पत्ता कापला 

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे'नेही बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली. सॅकनिल्कच्या माहितीनुसार, चित्रपटाने पहिल्याच दिवशी 60.60 कोटींचे नेट कलेक्शन केले. दुसऱ्याच दिवशी तो 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश करेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे आधीपासून प्रदर्शित असलेल्या 'जन नायकन' (8 दिवसांत 153.55 कोटी), 'द ओडिसी' (135.25 कोटी) आणि 'भाई तेरा स्टार है' (पहिल्या दिवशी 0.25 कोटी) यांच्या कमाईवर परिणाम झाला.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 'स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे'ने 84.61 कोटींचा टप्पा पार केला होता. वृत्त लिहिपर्यंत दुसऱ्या दिवशी 24.01 कोटींची कमाई झाली होती.

बॉक्स ऑफिसचं बदलतं गणित

यंदा 'धुरंधर 2', 'वेलकम टू द जंगल', 'धमाल 4' आणि 'राजा शिवाजी' हे चित्रपट हिट ठरले. मात्र, मोठी स्टारकास्ट असूनही त्यांच्या कमाईने अपेक्षित विक्रम केले नाहीत. त्याउलट हॉलिवूड चित्रपटांनी भारतातही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळवत दमदार कमाई केली.

या चार हॉलिवूड चित्रपटांनी भारतात मिळून 351.75 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. तर 'स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे'ची कमाई अजूनही सुरू आहे. कोविडनंतर प्रेक्षक चित्रपटांच्या निवडीबाबत अधिक सजग झाले आहेत. त्यामुळे केवळ मोठी स्टारकास्ट नव्हे, तर दमदार आशय असलेल्या चित्रपटांनाच पसंती मिळत असून, हॉलिवूड चित्रपटांनाही भारतीय प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.