Border 2 Teaser: सनी देओल आणि वरुण धवन स्टार ‘बॉर्डर 2’ चित्रपटाचा टीझर अखेर प्रदर्शित झाला आहे. (Border 2 Teaser) हा टीझर पाहिल्यानंतर आणि सनी देओलच्या भारदस्त आवाजातील डायलॉग ऐकल्यावर अंगावर काटे येतात. टीझरनंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
1997 साली प्रदर्शित झालेल्या सनी देओलच्या ‘बॉर्डर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार धडक मारली होती. अनेक आठवडे थिएटरमध्ये चाललेल्या या चित्रपटाने भरघोस कमाईदेखील केली. आता 28 वर्षांनंतर सनी देओल पुन्हा एकदा तीच जादू ‘बॉर्डर 2’ मधून दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. साधारण दीड वर्षांपूर्वी या चित्रपटाची घोषणा झाली होती आणि आता अखेर हा सिनेमा तयार झाला आहे. आज प्रदर्शित झालेल्या टीझरनंतर चाहते या चित्रपटाच्या थिएटरमधील रिलीजची वाट बघत आहेत. या टीझरमध्ये वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ हे तिघेही देशाच्या तिन्ही सैन्यदलांच्या आर्मी, वायुदल आणि नौदलाच्या वर्दीत दिसत आहेत.
दमदार टीझरने वाढवली उत्सुकता
अवघ्या एका मिनिटाच्या या टीझरची सुरुवात सनी देओलच्या भारदस्त आवाजाने होते. व्हिडीओमध्ये वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी हे शत्रूंशी जोरदार लढताना दिसतात. या पार्श्वभूमीत सनी देओल आपल्या जवानांना युद्धासाठी प्रेरित करताना ऐकू येतो.
या टीझरमधील सनी देओलचा एक नवा डायलॉग सध्या चांगलाच चर्चेत आहे. सनी देओल आपल्या दमदार आवाजात म्हणतात, “आवाज कहा तक जाना चाहिए” यावर जवान उत्तर देतात, “यहां तक” हा संवाद ऐकून प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. एका दृश्यात सनी देओल मूळ ‘बॉर्डर’ चित्रपटाप्रमाणे हातात तोफ घेऊन जबरदस्त अॅक्शन करतानाही दिसतोय.
रिलीज डेट कधी?
अनुराग सिंह यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘बॉर्डर 2’ चा हा टीझर प्रेक्षकांना प्रचंड भावतो आहे. अनेक युजर्सनी टीझरवर प्रतिक्रिया केल्यात. अनेकांनी हा टीझर ‘बेस्ट’ असल्याचं म्हटलंय. विशेषतः सनी देओलचा आवाज ऐकू येताच अंगावर काटा असल्याचंही अनेक जण म्हणालेत. या चित्रपटात मोना सिंह, सोनम बाजवा आणि मेधा राणा या अभिनेत्रीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मूळ ‘बॉर्डर’ चित्रपटाचे निर्माते जेपी दत्ता हेच ‘बॉर्डर 2’ची निर्मिती करत आहेत. हा बहुचर्चित सिनेमा 23 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.