मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतला कोणताही दिलासा देण्यास नकार देत हायकोर्टानं तिची याचिका फेटाळून लावली आहे. लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या तक्रारीनंतर अंधेरी दंडाधिकारी कोर्टानं सुरू केलेली कारवाई ही कायदेशीरदृष्ट्या योग्यच असल्याचा निर्वाळा हायकोर्टानं दिला आहे. अंधेरी दंडाधिकारी न्यायालयानं सुरू केलेली मानहानीच्या खटल्याची कारवाई अयोग्य आहे त्यामुळे ती रद्द करावी अशी मागणी कंगनानं हायकोर्टात केली होती. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी 1 सप्टेंबर रोजी राखून ठेवलेला आपला निकाल गुरूवारी जाहीर केला.


Tejas Shooting : कंगना रनौत आता मिशन 'तेजस' वर, पायलटच्या गणवेशातील फोटो शेअर करत चाहत्यांना दिली माहिती


काय आहे याचिका?


कंगनाविरोधात जावेद अख्तर यांनी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी अब्रुनुकसानीचा दावा केला होता. यामध्ये न्यायालयानं खटल्याची कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई रद्दबातल करण्यासाठी कंगनानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली असून दंडाधिकारी कोर्टानं नियमबाह्य पध्दतीनं ही कारवाई केल्याचा आरोप कंगनानं या याचिकेतून केला होता. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्यापुढे या याचिकेवर सुनावणी झाली. अख्तर यांच्यावतीनं दंडाधिकारी न्यायालयानं याप्रकरणी केलेली कारवाई ही कायदेशीर प्रक्रियेनुसारच केली आहे. तसेच अब्रुनुकसानीच्या फौजदारी दाव्यात आवश्यक असलेल्या तरतुदींचं पूर्ण पालन करण्यात आलं आहे आहे, असा दावा केला आहे. मात्र निव्वळ पोलिसांनी केलेल्या चौकशीवर ही कारवाई आहे, न्यायालयाने स्वतंत्र चौकशी केली नाही, असा बचाव कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी केला होता.



काय आहे प्रकरण?


कंगनानं एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जावेद अख्तर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सोशल मीडियावरही ही मुलाखत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. मात्र हे आरोप तथ्यहिन आणि बोगस आहेत, असा आरोप अख्तर यांनी दंडाधिकारी न्यायालयात केलेल्या मानहानीच्या दाव्यात केला आहे. न्यायालयानं याची दखल घेत जुहू पोलीस ठाण्याला यावर चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यावर पोलिसांनी दिलेल्या अहवालात स्पष्ट केलं आहे की अख्तर यांच्या या तक्रारीत तथ्य आहे. त्यामुळे न्यायालयाने कंगनाला फेब्रुवारीमध्ये समन्स बजावलं आहे. अंधेरी न्यायालयात यावर 14 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे ज्यात आता कंगनाची हजेरी अनिवार्य राहील.