शाहरुखच्या 'झीरो'चं पहिल्या दिवसाचं कलेक्शन...
एबीपी माझा वेब टीम | 22 Dec 2018 01:40 PM (IST)
शाहरुखच्या चाहत्यांनी रिलीजपूर्वीच म्हणजेच रिव्ह्यू येण्यापूर्वी सिनेमाचं बुकिंग केल्यामुळे पहिल्या दिवशी 20.14 कोटींची कमाई झाली. परंतु वीकेंडला या सिनेमाला उतरती कळा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई : शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ... मल्टिस्टारर, बिगबजेट आणि बहुप्रतीक्षित अशा 'झीरो' चित्रपटाने प्रेक्षक आणि समीक्षकांचा पुरता अपेक्षाभंग केला. पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 20.14 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तरीही वीकेंडला या सिनेमाची खरी परीक्षा असेल. शाहरुखच्या चाहत्यांनी रिलीजपूर्वीच म्हणजेच रिव्ह्यू येण्यापूर्वी सिनेमाचं बुकिंग केल्यामुळे पहिल्या दिवशी 20.14 कोटींची कमाई झाली. परंतु वीकेंडला या सिनेमाला उतरती कळा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शाहरुखच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा 'ए-वन' आहे, मात्र टीकाकारांनी सोशल मीडियावर ट्रोल्सही सुरु केले आहेत. शुक्रवार ते रविवार आणि मंगळवारी आलेली नाताळची सुट्टी यामुळे 'झीरो'ला लाँग वीकेंड मिळाला आहे. मात्र एकावर दोन 'झीरो' अर्थात शंभर कोटींचा गल्ला जमवण्यासाठी या सिनेमाला किती धडपड करावी लागणार, याची सर्वांना उत्सुकता आहे. फॅन आणि हॅरीपेक्षा बरा... शाहरुखच्या 'झीरो'पेक्षा गेल्या वर्षी आलेल्या 'फॅन' आणि 'जब हॅरी मेट सेजल' या सिनेमांनी सुमार कामगिरी केली होती. 'फॅन'ने 19.07 कोटी, तर अनुष्कासोबतच्याच 'हॅरी..'ने पहिल्या दिवशी 15.25 कोटी जमवले होते. शाहरुखच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत 'झीरो' टॉप 5 मध्ये आहे. त्यामुळे नॉन-हॉलिडे शुक्रवार असूनही 'झीरो'ने बरी कामगिरी केली, असं काही चित्रपट जाणकारांचं मत आहे. शाहरुखच्या चित्रपटांची पहिल्या दिवसाची कमाई हॅपी न्यू इयर 36.31 कोटी चेन्नई एक्स्प्रेस 33.12 कोटी रईस 20.42 कोटी दिलवाले 20.37 कोटी झीरो 20.14 कोटी फॅन 19.07 कोटी जब हॅरी मेट सेजल 15.25 कोटी रा.वन 14.73 कोटी डॉन 2- 14.60 कोटी जब तक है जान 12.61 कोटी डिअर जिंदगी 8.62 कोटी माय नेम इज खान 8.16 कोटी