मुंबई : टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंग आणि ब्रिटिश अभिनेत्री हेझल कीच विवाहबंधनात अडकून काहीच दिवस झाले आहेत. लग्नानंतर हेझलचं नाव बदलण्याविषयी युवराजच्या कुटुंबीयांना सुचवण्यात आलं, मात्र या सल्ल्यामुळे युवराजचे पिता योगराज सिंग चांगलेच संतापले आहेत.
30 नोव्हेंबर 2016 रोजी हेझल आणि युवराज चंदिगढमध्ये विवाहबद्ध झाले. हेझलचं नाव लग्नानंतर गुरबसंत कौर ठेवलं जाणार असल्याच्या चर्चा होत्या. सिंग कुटुंबाचे गुरु बाबा राम सिंग यांनी हे नाव सुचवल्याचं सांगितलं जातं. मात्र सासरेबुवा योगराज सिंग यांनी हा सल्ला फारसा रुचलेला नाही.
'हा काय मूर्खपणा आहे? माझ्यासाठी हेझल ही हेझलच राहणार कायम. नावात बदल केल्यामुळे तिची ओळख पुसली जाणार नाही' असं योगराज सिंग संतापाच्या स्वरात म्हणाले. 'माझा फक्त एकाच देवावर विश्वास आहे. ही सगळी स्वयंघोषित बाबा-महाराजांची वायफळ बडबड आहे.' असंही योगराज म्हणाले.
'युवराजची आई आणि आमच्या इतर कुटुंबीयांनी युवराजच्या लग्नाला हजेरी लावली होती. मात्र बाबा-महाराजांच्या बोलण्यावर माझा विश्वास नसल्यामुळे गेलो नव्हतो. अशा बडबडीमुळे माणसाचं नशीब बदलत नाही.' असा घणाघातही योगराज यांनी केला. 'माझ्या दृष्टीने ती सौ. हेझल युवराज सिंग आहे. नाव बदलण्याचा मुद्दा मी गांभीर्याने घेत नाही.' असंही योगराज यांनी स्पष्ट केलं.
युवराज आणि झोरावर ही योगराज आणि शबनम सिंग यांची मुलं आहेत. मात्र शबनम यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर योगराज यांनी सतबीर कौर यांच्याशी लग्न केलं.