तुम्ही फक्त प्रमाणपत्रं द्या, निवडीचा अधिकार प्रेक्षकांना : हायकोर्ट
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 10 Jun 2016 09:54 AM (IST)
मुंबई : एकादा सिनेमा चांगला आहे की वाईट हे प्रेक्षकांना ठरवू द्या. तुमचं काम चित्रपटाला प्रमाणपत्रं देण्याच आहे, असं म्हणत 'उडता पंजाब'च्या वादावरुन मुंबई उच्च न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाला सुनावलं आहे. 'उडता पंजाब' चित्रपटाप्रकरणी हायकोर्टात सुरु असलेली सुनावणी संपली असून आता सोमवारी अंतिम निकाल देण्यात येणार आहे. 'उडता पंजाब'वरील आजच्या सुनावणीत हायकोर्टाने सेन्सॉर बोर्डाला चांगलंच धारेवर धरलं. तुमचं काम प्रमाणपत्र देण्याचं आहे, टीव्ही असो की सिनेमा प्रेक्षकांना तो पाहू द्या, प्रत्येकाला निवड करण्याचा हक्क आहे, अशा शब्दात हायकोर्टाने ठणकावलं. 'उडता पंजाब' सिनेमातील भाषा अत्यंत शिवराळ आणि अपमानास्पद असल्याचं सेन्सॉर बोर्डाने सांगितलं आहे.यावर भाषा हा चित्रपटाचा अंतर्गत विषय असल्याचे हायकोर्टाने नमूद केलं. तसंच या वादामुळे 'उडता पंजाब'ला विनाकारण प्रसिद्ध मिळत असल्याचं निरीक्षणही कोर्टाने नोंदवलं आहे. अभिजीत चौबे दिग्दर्शित 'उडता पंजाब' 17 जून रोजी प्रदर्शत होणार आहे. शाहिद कपूर, आलिया भट आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत आहे.