Year Ender 2024: 2024 चा शेवटचा महिना सुरू आहे. सरत्या वर्षात काय घडलं? याबाबत आता सगळीकडेच सुरू आहे. अशीच चर्चा सुरू आहे, बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारची. बॉलिवूडमधलं सर्वात मोठं नाव. यापूर्वी अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिस हादरवलं, पण हे वर्ष खिलाडी कुमारसाठी फारसं खास ठरलं नाही, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण या वर्षात अक्षय कुमारचे तीन मोठाले चित्रपट बॉक्स ऑफिसवर आले, पण तिन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षेवर खरे उतरले नाहीत.
2024 हे वर्ष शेवटच्या टप्प्यात आहे. यावर्षी बॉलिवूडपासून साऊथ इंडस्ट्रीपर्यंत अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. असे चित्रपटही आले, ज्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली. ही बाब पॉजिटिव कलेक्शन आणि निगेटिव्ह कलेक्शन दोन्हींवर फिट बसते. जसं स्त्री 2 बाबत कोणीच विचार केला नव्हता की, हा चित्रपट एवढा मोठा ब्लॉकबस्टर ठरेल. तर, दुसरीकडे इंडियन 2 बाबत कुणी विचारही केला नव्हता की, हा चित्रपट एवढ्या जोरात बॉक्स ऑफिसवर आपटेल.
यंदाच्या वर्षात सर्वात जास्त हादरवलं असेल, तर ते अक्षय कुमारनं. मेकर्सनी या हिट स्टारवर कित्येक कोटी लावले. पण, एकही फिल्म हीट झाली नाही. सर्वच्या सर्व फिल्म्स फ्लॉप. फ्लॉप नाही तर, यंदाच्या वर्षीच्या सर्वात मोठ्या डिझास्टर फिल्म्समध्ये सामील झाल्या. अक्षय कुमार ब्रँडही या चित्रपटांना बुडण्यापासून वाचवू शकला नाही. यंदाच्या वर्षातल्या अक्षय कुमारच्या सक्सेस रेटबद्दल बोलायचं झालं तर, तो शून्य टक्के आहे.
अक्षय कुमारचे या वर्षात कोणकोणते चित्रपट आले? आणि मेकर्सनी त्यावर किती रुपये लावले आणि किती रुपये बुडाले? यावर एक नजर टाकुयात...
अक्षय कुमारचे 3 चित्रपट, या वर्षातले सर्वात मोठे डिझास्टर
अक्षय कुमारचे या वर्षी तीन चित्रपट प्रदर्शित झाले. पहिला चित्रपट बिग बजेट 'बडे मियाँ, छोटे मियाँ' होता. या चित्रपटात अक्षय कुमार-टायगर श्रॉफची जोडी होती. दोघेही मोठे ॲक्शन हिरो आहेत आणि हा चित्रपट बागी सारख्या चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियादवाला यांनी बनवला होता. त्यामुळे बॉलिवूडला नवा ब्लॉकबस्टर मिळणार असल्याची आशा निर्माण झाली. चित्रपटात 350 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती आणि चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात आले, परंतु बॉक्स ऑफिसवर पोहोचताच चित्रपट जोरात आदळला आणि सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, फक्त 65.96 कोटी रुपये कमावू शकला.
यानंतर अक्षय कुमारचा आणखी एक मोठा चित्रपट आला ‘सरफिरा’, जो 12 जुलैला प्रदर्शित झाला. साऊथचा सुपरस्टार सूर्याच्या सुपरहिट चित्रपट 'सूरराई पोत्रू'चा अधिकृत रिमेक असल्यामुळे सर्वांनाच या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, निर्मात्यांनी चित्रपटासाठी सुमारे 100 कोटी रुपयांचं बजेट गुंतवलं होतं, पण, चित्रपटानं केवळ 24.85 कोटी रुपयांची कमाई केली.
यानंतर अक्षय कुमारचा वर्षातील शेवटचा चित्रपट आला 'खेल खेल में'. जेव्हा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर आला, तेव्हा तो टॉप ट्रेंडिंगमध्ये होता, पण, बॉक्स ऑफिसवर काही चमत्कार करू शकला नाही. या चित्रपटाला 15 ऑगस्ट रोजी स्त्री 2 सोबत प्रदर्शित झाल्याचा फटका देखील सहन करावा लागला आणि चित्रपटानं केवळ 39.29 कोटी रुपयांची कमाई केली, तर कोइमोईच्या मते, या चित्रपटाचं बजेट देखील 100 कोटी रुपये होते.
मेकर्सला 77 टक्क्यांचं नुकसान
एकूणच, निर्मात्यांनी अक्षय कुमारवर सुमारे 550 कोटी रुपयांची पैज लावली, त्या बदल्यात त्यांना तिन्ही चित्रपटांच्या कलेक्शनसह केवळ 130.1 कोटी रुपये परत मिळाले. म्हणजेच, केवळ 23.63 टक्के रक्कम निर्मात्यांना परत मिळाली. कमाईबद्दल विसरूनच जा, अक्षय कुमारच्या चित्रपटांनी निर्मात्यांचे जवळपास 77 टक्के पैसे गमावले.
अक्षय कुमारची भविष्यातील रणनीती
अक्षय कुमार अभिनयात निष्णात मानला जातो. त्याला बॉलिवूडचा बादशाह असंही म्हटलं जातं. त्याच्या कॉमिक टायमिंग आणि ॲक्शनचे लाखो चाहते आहेत. हे वर्ष त्याच्यासाठी फारसं चांगलं गेलेलं नाही, परंतु पुढील वर्षी तो हेरा फेरी 3, भूत बांगला आणि हाऊसफुल 5 सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे, ज्यांच्याकडून लोकांना मोठ्या अपेक्षा आहेत.
याशिवाय, सिंघम अगेन आणि स्त्री 2 मधील त्याच्या कॅमिओनंतर, हे देखील स्पष्ट झालं आहे की, तो दोन भिन्न विश्वाच्या दोन मोठ्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यामुळे येत्या वर्षात अक्षय कुमारला त्याचा हिट मशीन टॅग पुन्हा मिळवण्यापासून कुणीच रोखू शकणार नाही, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.