मुंबई : अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीची महिला आयोगाने दखल घेतली आहे. तनुश्री दत्ताने तिच्या वकिलांमार्फत महिला आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यासाठी तनुश्री दत्ताने स्वत: महिला आयोगासमोर उपस्थित राहून आपले म्हणणे मांडावे, असे निर्देश आयोगाने दिले आहेत.
तनुश्री दत्ताच्या तक्रारीत उल्लेख असलेल्या अभिनेते नाना पाटेकर, गणेश आचार्य, निर्माता समीर सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग यांना आयोगाने नोटीस बजावली असून पुढील 10 दिवसात आपले म्हणणे आयोगाकडे मांडण्याचे निर्देश दिले आहेत.
तनुश्री दत्ताने आयोगाकडे दाखल केलेल्या आपल्या तक्रारीत मुंबई पोलिसांकडे सदर प्रकरणी गुन्हा दाखल केल्याचं स्पष्ट केलं आहे. मुंबई पोलिसांकडून याबाबत आतापर्यंत काय कार्यवाही करण्यात आली याचा अहवालही आयोगाने मागविला आहे.
सिनेसृष्टीतील अशा घटना रोखण्याची जबाबदारी निर्माते, दिग्दर्शक तसेच संबंधित संघटनांची देखील आहे. महिलांबाबत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी तसेच तक्रार करण्यासाठी यंत्रणा असणे आवश्यक आहे. यादृष्टीने कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण प्रतिबंध कायदा, 2013 या कायद्यानुसार सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने तात्काळ अंतर्गत तक्रार निवारण समिती (आयसीसी कमिटी) स्थापन करावी, असे निर्देश महिला आयोगाने सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनला दिले आहेत.
बॉलिवूडपासून दूर गेलेली अभिनेत्री तनुश्री दत्ताने आपल्यासोबत गैरवर्तन झाल्याची आठवण नुकतीच सांगितली. 2008 साली 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाच्या सेटवर अभिनेते नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला आहे. 'हॉर्न ओके..' सिनेमाच्या एका स्पेशल गाण्याचं शूटिंग सुरु होतं. त्यावेळी नाना पाटेकरांनी मला बाहुपाशात घेतलं. कोरिओग्राफर्सना दूर व्हायला सांगून डान्स कसा करावा, हे ते दाखवत होते, असं तनुश्रीने सांगितलं.
'झूम टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने हा आरोप केला. तो 'सोलो' डान्स असल्याचं काँट्रॅक्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं असतानाही त्यांना माझ्यासोबत इन्टिमेट सीन करायचा होता. मी इतकी अनकम्फर्टेबल झाले, की अखेर मी ते गाणं न करण्याचा निर्णय घेतला. तो अनुभव आठवून मी आजही दचकते, असं तनुश्री म्हणाली होती.
2003 साली फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर तनुश्रीने 2005 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'आशिक बनाया आपने' हा सिनेमा गाजल्यानंतर तिने चॉकलेट, ढोल, रिस्क, स्पीडसारखे काही सिनेमे केले. 2010 नंतर मात्र ती बॉलिवूडमध्ये दिसली नाही. पण तिने यापूर्वीही नाना पाटेकरांबाबत घडलेला हा किस्सा अनेकवेळा सांगितला आहे.
दहा वर्षांपूर्वी 'हॉर्न ओके प्लीज'च्या सेटवर नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला होता. त्यानतंर नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन तनुश्री मला मुलीसारखी असल्याचं म्हटलं होतं.
अनेक वर्षांनंतर अमेरिकेतून भारतात परतलेल्या तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ती म्हणाली होती की, "नानांचा महिलांशी छेडछाड करण्याचा इतिहास आहे. इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांना माहित आहे की, ते महिलांसोबत गैरवर्तन करतात. इतकंच नाही तर त्यांनी अभिनेत्रींवर हातही उगारला आहे."
'हॉर्न ओके प्लीज' सिनेमाच्या एका स्पेशल गाण्याचं शूटिंग सुरु होतं. त्यावेळी नाना पाटेकरांनी मला बाहुपाशात घेतलं. कोरिओग्राफर्सना दूर व्हायला सांगून डान्स कसा करावा, हे ते दाखवत होते, असं तनुश्रीने सांगितलं. 'झूम टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने हा आरोप केला.
संबंधित बातम्या
मला वकिलांकडून मीडियाशी न बोलण्याचा सल्ला : नाना पाटेकर
तनुश्रीचा नानांवरील आरोप खोटा, मनसेचाही संबंध नाही : राकेश सारंग
राज ठाकरेंना बाळासाहेबांची खुर्ची हवी होती : तनुश्री दत्ता
तनुश्रीच्या नाना पाटेकरांवरील आरोपांवर बिग बींची प्रतिक्रिया
तनुश्रीच्या गाडीवर हल्ला करणारा 'तो' व्यक्ती सापडला
बीडमध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ताविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल