पणजी: 49 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीच्या प्रतिनिधी नोंदणीला काल सायंकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान आयोजित इफ्फीमध्ये आतापर्यंत 64 देशांनी सहभाग नोंदवला आहे. यंदा क्रीडा विषयावरील चित्रपटांसाठी विशेष विभाग करण्यात आला आहे.


गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत इफ्फीची माहिती दिली.  इफ्फीचा उद्घाटन आणि समारोप सोहळा बांबोळी येथील श्यामाप्रसाद स्टेडियममध्ये होणार आहे. उद्घाटनाच्या सिनेमाचे प्रदर्शन कला अकादमीमध्ये केले जाणार आहे.

इफ्फी स्थळांच्या सजावटीची जबाबदारी प्रख्यात गोमंतकीय कला दिग्दर्शक भूपाल रामनाथकर यांच्या कडे सोपवण्यात आली आहे.रामनाथकर हे गोवा मनोरंजन संस्थेला सजावटीसाठी सर्वतोपरी मदत आणि मार्गदर्शन करणार आहेत.



यंदा कंट्री फोकस विभागासाठी इस्रायलची निवड करण्यात आली आहे. इस्रायलचे 6 ते 7 सिनेमा या विभागात इफ्फी प्रतिनिधींना पहायला मिळणार आहेत.

सिनेमा ‘ऑफ द वर्ल्ड’मध्ये आतापर्यंत 64 देशांनी सहभाग नोंदवला असून हा आकडा आणखी वाढू शकतो, असे तालक यांनी यावेळी सांगितले.

होमेज विभागात यावर्षी शशी कपूर,श्रीदेवी आणि विनोद खन्ना यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. या विभागात तिघांचे निवडक सिनेमे दाखवले जाणार असून, या विभागाच्या उद्घाटनासाठी कपूर कुटुंबीयांपैकी कोणी तरी यावं, यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे तालक यांनी सांगितले.

यंदापासून क्रीडा विभाग सुरु करण्यात आला असून खेळाशी संबंधित 6 ते 7 सिनेमे त्याअंतर्गत प्रदर्शित केले जाणार आहेत.

इफ्फी प्रतिनिधींव्यतिरिक्त इतर सिनेमाप्रेमींना सिनेमा जगताचा आस्वाद घेता यावा, यासाठी साग मैदानावर बायोस्कोप व्हिलेजची निर्मिती केली जाणार आहे. तेथे 4 तंबू थिएटर उभारून विविध सिनेमे दाखवले जाणार आहेत. त्यात मुलांसाठी, त्याचबरोबर मराठी आणि भारतीय सिनेमे प्रदर्शित केले जाणार आहेत.

वातानुकूलित 150 आसन क्षमता असलेल्या थिएटर्स मध्ये 5.1 साउंड सिस्टीमसह सिनेमा बघता येणार आहेत. याशिवाय 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान कट्यावर अनेक सिनेमा सेलिब्रिटीं सोबत गप्पाचे फड रंगणार आहेत.