Urfi Javed On Sonali Kulkarni : मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) सध्या चर्चेत आहे. नुकतंच एका कार्यक्रमात सोनालीने लग्न आणि त्याबद्दलची भारतातील मुलींची मानसिकता यावर आपलं मत व्यक्त केलं होतं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. आता यावर मॉडेल उर्फी जावेदने (Urfi Javed) प्रतिक्रिया दिली आहे. 


उर्फी जावेद काय म्हणाली? (Urfi Javed Tweet)


सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य उर्फी जावेदला खटकलं आहे. तिने ट्वीट करत आपला विरोध दर्शवला आहे. तिने सोनालीचा व्हिडीओ शेअर करत ट्वीट केलं आहे की, "तुम्ही जे बोललात ते किती असंवेदनशील आहे. आताच्या आधुनिक काळातील महिला घर आणि ऑफिस दोन्ही गोष्टी व्यवस्थित सांभाळत आहेत. अशा महिलेला तुम्ही आळशी म्हणालात. 


उर्फीने पुढे लिहिलं आहे,"नवरा चांगला कमावणारा हवा, असं जर एखाद्या मुलीला वाटत असेल तर त्यात गैर काय? स्त्री हे फक्त मुलं जन्माला घालणारं यंत्र नाही. महिलांनो तुम्हाला जे हवं आहे ते न घाबरता बिनदास्त मागा. महिलांनी काम करायलं हवं हे योग्य आहे. पण हा विशेषाधिकार प्रत्येकाला मिळतोच असं नाही".






सोनाली कुलकर्णी काय म्हणाली होती? (Sonali Kulkarni Viral Video)


सोनाली कुलकर्णीने नुकतचं एका कार्यक्रमात लग्नासाठी मुलगी शोधताना मुलींच्या अपेक्षांबद्दल भाष्य केलं होतं. ती म्हणाली होती की, "भारतातील अनेक मुली आळशी आहेत. ज्या मुलाकडे चांगली नोकरी, घर आणि उत्तम पगार आहे असाच मुलगा मुलीला पती किंवा बॉयफ्रेंड म्हणून हवा आहे. त्यामुळे स्वत:साठी कमवू शकेल, घरातील सामान घेण्यासाठी पतीला अर्धे पैसे देईल, अशी स्त्री तुमच्या घरात निर्माण करा." 


सोनाली पुढे म्हणाली की, "मुली काय मॉलमध्ये आल्या आहेत का? त्यांना मुलगा हवा आहे की ऑफर? हे खूप अपमानास्पद आहे. मुलगा 18 वर्षांचा झाल्यानंतर कुटुंबाला हातभार लावण्याचा तो प्रयत्न करतो. पण मुलींच्या बाबतीत असं होत नाही. त्यांना हनिमूनसाठी भारत नको असतो तर परदेशी जायचं असतं. डेस्टिनेशन वेडिंग, प्री-वेडिंग या सगळ्याचा खर्च मुलानेच का करायचा. मुलींना जर आरामाचं आयुष्य जगायचं आहे तर त्यांनी देखील कमवावं. बिलं भरणं हे फक्त नवऱ्याचं काम नाही". 


सोनाली कुलकर्णीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. राजकारणी, टीकाकार, नेटकरी कोणालाही न घाबरता उर्फी जावेद आपलं मत मांडत असते. आता तिने सोनाली कुलकर्णीवरदेखील निशाणा साधला आहे. 


संबंधित बातम्या


Sonali Kulkarni : 'भारतातील बऱ्याच मुली आळशी आहेत'; सोनालीच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष