मुंबई : बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचबद्दल बॉलिवूडच्या मोठमोठ्या अभिनेत्रींनी तोंड उघडल्यानंतर 'मसान'फेम अभिनेत्री रिचा चढ्ढानेही या प्रकाराला दुजोरा दिला आहे. मात्र, माझ्या सुरक्षेची हमी दिल्यास मी 'त्या'चं नाव जाहीर करेन, अशी अट रिचाने घातली.


'मला आयुष्यभरासाठी वेतन, माझ्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेची तजवीज, मला चित्रपट, टीव्ही किंवा जिथे हवं तिथे काम मिळू देण्याची हमी, माझं करिअर सध्या ज्याप्रकारे सुरु आहे, तसंच राहू देण्याची काळजी घेतली गेली, तरच मी त्याचं नाव सांगेन. फक्त मीच नाही, माझ्यासारख्या लाखो तरुणी नावं घेतील. पण ही हमी कोण देणार?' असा सवाल रिचाने पीटीआयशी बोलताना उपस्थित केला.

'मला बॉलिवूडमधील एका अभिनेत्याला मेसेज करुन त्याच्यासोबत डेटवर जायला सांगितलं होतं. मात्र तो अभिनेता विवाहित असल्यामुळे मी तसं करण्यास नकार दिला. त्यानंतर माझ्या करिअर ग्रोथसाठी एका क्रिकेटरसोबत रिलेशनशीपमध्ये राहण्याचा सल्लाही देण्यात आला.' असं रिचाने सांगितलं.

'आपण एखादं पाऊल उचललं, तर लगेच विरोध होतो. बॉलिवूडची रचना बदलायला हवी. कायदा नसल्यामुळे अभिनेत्यांना ती निश्चिंतता नाही. त्यामुळे कोण रिस्क घेणार?' असा प्रश्नही रिचाने विचारला

रिचाने 2008 मध्ये आलेल्या 'ओए लकी लकी ओए' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर फुक्रे, गँग्ज ऑफ वासेपूर, रामलीला, मसान, मै और चार्ल्स, सरबजीत यासारख्या चित्रपटात भूमिका केली आहे. नुकताच तिच्या फुक्रे चित्रपटाचा सिक्वेल रीलिज झाला आहे.