Nancy Tyagi Indian Fashion Influencer Cannes 2024 : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'च्या रेड कार्पेटवर बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतचे सेलिब्रिटी पाहायला मिळत आहेत. ऐश्वर्या रायपासून (Aishwarya Rai) ते उर्वशी रौतेलापर्यंत अभिनेत्रींनी आपल्या फॅशन सेन्सचा जलवा दाखवला आहे. या अभिनेत्रींच्या मांदियाळीमध्ये अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनेदेखील या कान्स महोत्सवात हजेरी लावली. यामध्ये भारतीय रील स्टारने आपली छाप सोडली आहे. कान्सच्या रेड कार्पेटवर तिने स्वत: डिझाइन केलेल्या गाऊनसह पदार्पण करून फॅशन इंडस्ट्रीत खळबळ उडवून दिली आहे. नॅन्सी गुप्ता असे या भारतीय रील स्टारचे नाव आहे. नॅन्सीही सध्या 23 वर्षांची आहे. 


तुम्ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असाल आणि फॅशनबद्दल तुम्हाला आवड असेल तर काही वेळेस तुम्ही नॅन्सीचे व्हिडीओ पाहिले असतील. नॅन्सीचे फॅशन ड्रेसच्या व्हिडीओवर लाइक्सचा वर्षाव होत असतो. आता याच नॅन्सीने थेट कान्सच्या रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला आहे. 


20 किलोचा ड्रेस, 30 दिवसांचा कालावधी...


नॅन्सीने 77 व्या कान्सच्या रेड कार्पेटसाठी स्वत: डिझाइन केलेला गाऊन कॅरी केला. पिंक कलरच्या फ्रिल गाऊनमध्ये ती एखादी राजकुमारी वाटत होती. नॅन्सीच्या या ड्रेसचे वजन 20 किलो होते. या ड्रेससाठी 1000 मीटर कपड्याचा वापर झाला. नॅन्सीला हा हेवी गाऊन तयार करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी लागला. आपला लूक परफेक्ट करण्यासाठी मॅचिंग ग्लोव्हज आणि लाइट वेट नेकपीस पेअर केलं. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केल्यानंतर ब्रूटशी झालेल्या संवादात नॅन्सी म्हणाली की, तिचे स्वप्न इतके मोठे नव्हते, की आज ती जिथे उभी आहे. तिने 1000 मीटर फॅब्रिकचा वापर करून अवघ्या एका महिन्यात तिचा गाऊन बनवला.






उत्तर प्रदेशातील बरनावा  या छोट्याशा गावातून कान्सच्या रेड कार्पेटवर नॅन्सी त्यागीची झालेली एन्ट्री म्हणजे पाहिलेलं एक स्वप्न आणि ती पूर्ण करण्यासाठी असलेल्या जिद्दीला मिळालेले यश आहे असे म्हणावे लागेल.  सोशल मीडियावर  फॅशन इन्फ्लुएंसर म्हणून नॅन्सी चांगलीच लोकप्रिय आहे.


युपीएससीसाठी दिल्ली गाठली पण कोरोनामुळे मिळाला टर्निंग पाँईंट


बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर  नॅन्सीने यूपीएससीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 2020 मध्ये दिल्ली गाठली. कोरोना महासाथीच्या काळात कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळू लागल्यानंतर तिने शिवणकाम सुरू केले. नॅन्सीने आपल्या या शिवणकामाला सोशल मीडियाची जोड दिली. नॅन्सीने तिने शिवलेल्या कपड्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली. नॅन्सीने तयार केलेल्या फॅशन व्हिडीओला लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. हळूहळू ती आउटफिट डिझाइनमुळे चर्चेत राहू लागली. 



नॅन्सी त्यागीने सोशल मीडियावर 'स्क्रॅचमधून आउटफिट्स' बनवण्यावर एक सीरिज चालवली. यामध्ये ती तिचा प्रत्येक ड्रेस  स्क्रॅचमधून बनवायची. या सीरिजने तिला प्रेक्षकांमध्ये ओळख मिळवून दिली.


नॅन्सी त्यागीचे स्वत:चे युट्युब चॅनेलदेखील आहे. यामध्ये सेलिब्रिटी इन्स्पायर्ड ड्रेस तयार करते आणि स्वत: परिधान करून व्हिडीओ पोस्ट करते.