मुंबई : प्रेक्षकांची प्रचंड उत्सुकता ताणून धरलेला 'बाहुबली 2' अर्थात 'बाहुबली द कन्क्ल्युजन' रिलीज झाला आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांना भव्यता आणि भारदस्तता पाहायला मिळाली.

बाहुबली सिनेमाचा पहिला भाग दीडवर्षापूर्वी रिलीज झाला. तेव्हापासून प्रेक्षक बाहुबलीच्या दुसऱ्या भागाची चातकाप्रमाणे वाट पाहात होते.

सिनेक्षेत्रात सर्वाधिक चर्चिला गेलेला, उत्सुकता ताणून धरलेला सिनेमा म्हणून बाहुबलीकडे पाहता येईल. कटप्पाने बाहुबलीला का मारलं या प्रश्नाने देशवासियांची उत्सुकता वाढली होती. हीच उत्सुकता वाढवणारा दिग्दर्शक म्हणजे के राजामौली होय.

कोण आहे के राजामौली?

जर तुम्ही 'मगाधीरा' आणि 'ईगा' हे दोन सिनेमे पाहिले असाल, तर बाहुबली बनवणारा कोण असू शकेल, याचा अंदाज बांधू शकाल.

43 वर्षीय राजामौली यांनी 2015 मध्ये 'बाहुबली द बिगनिंग' हा सिनेमा बनवला होता. हा सिनेमा केवळ दक्षिण भारतातच नाही तर संपूर्ण भारत आणि परदेशातही गाजला. या सिनेमावरुनच राजमौली यांनी आपण बॉलिवूडलाही फाईट देत असल्याचं दाखवलं होतं.

'बाहुबली 2' या सिनेमाने पहिल्याच दिवशी 121 कोटी रुपयांची कमाई करत नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला. इतकंच नाही तर सलमान, आमीर आणि शाहरुख या खान मंडळीचा विक्रम बाहुबलीने मोडला.

बाहुबली 2 हा सिनेमा एकाचवेळी तामीळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी या भाषांमध्ये रिलीज झाला आहे.

फिल्मी दुनिया वारसाहक्कामध्ये


एस एस राजामौली यांना घरातूनच फिल्मी दुनियेचा वारसा मिळाला. त्यांचे वडील विजयेंद्र प्रसाद टॉलिवूडचे प्रसिद्ध पटकथा लेखक (स्क्रिप्ट रायटर) आहेत.

राजामौली यांचा जन्म कर्नाटकातील रायचूरमध्ये 10 ऑक्टोबर 1973 रोजी झाला. जन्म कर्नाटकचा असला तरी राजामौली हे आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील कोवूर शहरातील आहेत.

राजमौली यांनी चौथीपर्यंतचं शिक्षण कोवूरमध्येच पूर्ण केलं. त्यानंतर ते बारवीपर्यंत एलूरमध्ये शिकले.

त्यांचे वडील आणि भाऊ सिनेसृष्टीशीच संलग्न होते. त्यामुळे आपसूकच राजामौलींचाही ओढा सिनेजगताकडेच होता.

राजामौली यांनी कोटागिरी वेंकटेश्वर राव यांचे सहाय्यक म्हणून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं.

त्यानंतर ते दिग्दर्शक राघवेंद्र राव यांचेही असिस्टंट होते. राघवेंद्र यांच्यासोबत राजामौली यांनी शांती निवासम टीव्ही मालिकेत काम केलं.

सुरुवातीच्या काळात राजामौली यांनी जिद्द आणि कष्टाच्या जोरावर आपल्या कामात छाप पाडली. ज्या ज्या दिग्दर्शकांसोबत राजामौली यांनी काम केलं, ते-ते सर्व भारावून गेले.

राजामौली यांनी 2009 मध्ये 'मगाधीरा' आणि 2012 मध्ये 'ईगा' हे सिनेमे बनवले. या दोन सिनेमांनी राजामौली यांना ओळख दिली. सिनेसृष्टीत राजामौली हे नाव आदराने घेतलं जाऊ लागलं.

'मगाधीरा' या सिनेमाची संपूर्ण देशाने वाहवा केली.

मग 2015 साल उजाडलं आणि राजामौली यांनी बाहुबली बनवून, टॉलिवूडच नव्हे तर बॉलिवूडचीही रुळलेली सर्व समीकरणं उधळून लावली. 'बाहुबली'ने राजामौली यांना यशाच्या शिखरावर पोहोचवलं. राजामौली हे बॉक्स ऑफिसवर 'बाहुबली' बनले!

बाहुबली हा जगभरात 650 कोटी कमावणारा पहिला दक्षिण भारतीय, आणि हिंदीत डब करुन 100 कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा पहिला सिनेमा ठरला.

जिथे बाहुबलीने बॉलिवूडचे रेकॉर्ड मोडले, तिथे टॉलिवूड किंवा तेलुगू सिनेमांचं काय? तेलुगू सिनेसृष्टीत बाहुबलीने इतिहास रचला.

बाहुबली 2: द कन्क्लुजन या सिनेमाने तर रिलीज आधीच सॅटलाईट आणि प्रसारण हक्काच्या विक्रीतून तब्बल 5 अब्ज अर्थात 500 कोटी रुपये कमावले आहेत.

आता 28 एप्रिल 2017 रोजी हा सिनेमा जगभरात 9 हजार स्क्रिनवर रिलीज झाला आहे.

पुरस्कार

राजामौली यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, तीन फिल्म फेयर अॅवॉर्ड, नंदी अवॉर्ड, IIFA आणि स्टार वर्ल्ड इंडियाचा एंटरटेनर ऑफ द इयर असे अनेक पुरस्कार राजामौली यांना मिळाले.

2016 मध्ये राजामौली यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.