मुंबई : रेल्वे प्रवासादरम्यान अस्वच्छता आणि गलिच्छपणाचा फटका अनेक प्रवाशांना बसल्याची अनेक उदाहरणं पाहिलं आहेत. रेल्वे प्रवाशांनी प्रवासादरम्यान ट्विट करुन आपली गाऱ्हाणं रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंकडे मांडली आहेत. रेल्वेनेही प्रवाशांना तातडीने मदत केल्याचं आपण पाहिलं आहे.


मात्र रेल्वेतील अशाच संतापजनक घटनेचा फटका अभिनेत्री निवेदिता सराफ यांना बसला. रेल्वेप्रवासादरम्यान निवेदिता सराफ यांची पर्स उंदराने कुरतडली.

काय आहे प्रकरण?

निवेदिता सराफ या नाटकासाठी लातूर एक्स्प्रेसने लातूरला जात होत्या. एसी सेकंड क्लासने त्यांचा प्रवास सुरु होता. प्रवासादरम्यान त्यांनी आपली पर्स डोक्याखाली ठेवली होती. मात्र चक्क उंदराने या पर्सकडे धाव घेऊन ती कुरतडून टाकली.

लातूर स्टेशनवर उतरत असताना, पर्स पाहिल्यानंतर निवेदिता सराफ यांच्या हा प्रकार लक्षात आला.

हे कमी म्हणून की काय, मुंबईला परतत असताना, त्यांना पुन्हा एकदा मनस्तापाला सामोरं जावं लागलं. टीसीने त्यांची आरक्षित सीट आधीच दुसऱ्या प्रवाशाला दिली होती. इतकंच नाही तर ही रेल्वे एक-दोन नव्हे तर तब्बल 5 तास उशिरा आली.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच मार्गावरुन धावणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्येही उंदराचा उपद्रव आढळून आला होता. शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी यांसदर्भात व्हिडिओ काढून तक्रारही केली होती. पुन्हा तोच प्रकार निवेदिता सराफ यांच्यासोबत घडला आहे.