RRR Song NATU-NATU : जगभरात आज भारताच्या आरआरआर सिनेमातील नाटू नाटू गाण्याचा बोलबाला आहे. त्याचं कारण आम्ही वेगळं सांगायची गरजच नाही मुळी. नाटू नाटू गाण्याला ऑस्करचा पुरस्कार मिळाला आणि आरआरआरचा झेंडा अटकेपार रोवला गेला... खरंतर नाटू या शब्दाचा अर्थ होतो, अस्सल देशी... आणि या गाण्यातून नाचायचं कसं?, हेच शब्द या मधून मांडलंय... नाचायचं कसं तर उन्मत्त बैलांसारखं... नाचायचं कसं तर हिरव्यागार मिरचीच्या ठेच्यासारखं... नाचायचं कसं तर खोलवर घुसणाऱ्या कट्यारीच्या धारेसारखं... नाचायचं कसं तर अंगावर आसून ओढणाऱ्या पोतराजासारखं... नाचायचं कसं तर वडाच्या झाडाखाली जमलेल्या पोरांसारखं... आणि ज्वारीच्या भाकरीसोबत मिरचीचा ठेचा खाल्ल्यासारखं... अर्थात, नाटू नाटू गाणं हे भारताच्या अस्सल ग्रामीण जीवनाशी आणि मातीशी नाळ सांगतंय... आणि हीच भारतीय अस्सल माती आता नाटूच्या कपाळावर ऑस्करचा गुलाल लावणारी ठरलीय.
आरआरआर चित्रपटाने ऑस्करला गवसणी घातली. ज्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, ज्या सिनेमातील गाण्याची सगळीकडेच हवा आहे त्याच नाटू नाटू गाण्याने थेट ऑस्करमध्ये बाजी मारली आहे. ‘बेस्ट ओरिजनल साँग’ या कॅटेगरीमध्ये नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळालाय.
राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर या दोघांनीही या गाण्याला पुरेपूर न्याय दिलाय. खरं तर त्यांचं हे गाणं वाजलं तरी आपोआपच पाय थिरकतात. मग या सोहळ्यात हे गाणं वाजणार नाही असं कसं होईल. या सोहळ्यातही या गाण्यावर काही कलाकारांनी डान्स परफॉर्म केला. पण हो त्या आधी अभिनेत्री दीपिका पदुकोनने या गाण्याचं कौतुक केलं.
दिग्दर्शक राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ सिनेमाने संपूर्ण जगावर गारुड केलं आहे. जपानमध्ये तर या सिनेमाने रजनीकांत यांच्या सिनेमांचा रेकॉर्डही मोडीत काढलाय. आजही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. आरआरआर सिनेमाची कमाई देशात 750 कोटींपेक्षा जास्त आहे. जगभरात 1100 कोटींहून आधिक कमाई केली. तर आरआरआर सिनेमाने आतापर्यंत अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलंय.
नाटू नाटू गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाण्याचा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कार सोहळ्यात आरआरआर सिनेमाची बाजी मारली. सर्वोत्कृष्ट अॅक्शन पट, सर्वोत्कृष्ट स्टंट्स, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय सिनेमा आणि सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला.
‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या डॉक्युमेंट्रीनेही ऑस्करमध्ये बाजी मारली. कार्तिकी गोन्सालवेस आणि गुनीत मोंगा यांच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या डॉक्युमेंट्रीत हत्तीचं पिल्लू आणि त्याला वाढणाऱ्या वयस्कर जोडप्यांची कहाणी आहे. 41 मिनिटांच्या डॉक्यूमेंट्रीत प्राणी आणि माणसांमधील नातं उलगडलंय.. बेस्ट डॉक्युमेंट्री ऑन शॉर्ट सब्जेक्ट हा पुरस्कार या डॉक्युमेंट्रीला मिळालाय..
आजच्या या पुरस्कारानंतर भारतीय कलाकारांकडून सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होतोय. लेडी गागासारख्या विख्यात गायिकेचं गाणं स्पर्धेत असताना एका भारतीय गाण्यानं ऑस्कर पटकावणं हे अतिशय मोठं यश आहे.त्यामुळे आरआरआर टीमच्या कष्टाला फळ आलं असंच म्हणावं लागेल.