पश्चिम बंगाल : पुस्तकात मिल्खा सिंह म्हणून फरहान अख्तरचा फोटो
एबीपी माझा वेब टीम | 20 Aug 2018 11:37 AM (IST)
दुसरीकडे, राज्याचे शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांनी संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
कोलकाता : पश्चिम बंगालच्या शालेय अभ्यासक्रमातील एका पुस्तकात 'फ्लाईंग सिख'च्या नावाने प्रसिद्ध भारतीय धावपटू मिल्खा सिंह यांच्याजागी बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरचा फोटो छापला आहे. 2013 मधील फरहानचा सुपरहिट चित्रपट 'भाग मिल्खा भाग'मधील हा फोटो असून तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोकांनी पश्चिम बंगालच्या शिक्षण व्यवस्थेविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे. अशाप्रकारच्या शिक्षणामुळे मुलांच्या भविष्यासोबत खेळ सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याबाबत समजताच अभिनेता फरहान अख्तरने तातडीने पश्चिम बंगालच्या शिक्षण मंत्रालयाला ट्वीट करुन ही चूक दुरस्त करण्याची विनंती केली. "एका पुस्तकात मिल्खा सिंह यांच्या जागी चुकीच्या फोटोचा वापर करण्यात आला आहे. ही चूक प्रकाशकाला दाखवून त्यात बदल करु शकता का?" सर्वात आधी 'Lyfe Ghosh' नावाच्या ट्विटर युझरने ही चूक समोर आणली. यावेळी त्याने फरहान अख्तरला मेंशन केलं होतं. यानंतर फरहानने शिक्षणमंत्र्यांना ट्वीट करुन लवकरात लवकर ही चूक सुधारण्याची विनंती केली. दुसरीकडे, राज्याचे शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांनी संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.