कोलकाता : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनसोबत एका चाहत्याने कोलकात्यातील डमडम विमानतळावर गैरवर्तन केलं. सेल्फी घेताना चाहत्याने विद्याच्या परवानगीविना तिला मिठी मारुन सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला.
विद्याने चाहत्याला दूर राहण्यास सांगितले. शिवाय, विद्याच्या मॅनेजरनेही चाहत्याला बाजूला हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने विद्या आणि तिच्या मॅनेजरकडे दुर्लक्ष करत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत राहिला.
अखेर संतापलेल्या विद्याने चाहत्याला धक्का दिला आणि बाजूला सारून निघून गेली.
या संपूर्ण घटनेनंतर स्पॉटबॉयशी बोलताना विद्या म्हणाली, “जर कुणी अज्ञात व्यक्ती तुम्हाला स्पर्श करत असेल, मग पुरुष असो वा स्त्री, तर अनकम्फर्टेबल जाणवू लागतं. कारण ती व्यक्ती तुमच्या वैयक्तिक आयुष्यात घुसण्याचा प्रयत्न करत असते. आम्ही पब्लिक फिगर आहोत, पब्लिक प्रॉपर्टी नाही.”
आपल्या आगामी ‘बेगम जान’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी विद्या बालन कोलकात्यात होती. यावेळी विद्यासोबत ‘बेगम जान’चे निर्माते आणि दिग्दर्शकही होते.