मुंबई : मुंबईत आज म्हणजे 26 डिसेंबरला विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नाचं ग्रॅण्ड रिसेप्शन आहे. यात खेळ, बिझनेस, फिल्म आणि राजकीय क्षेत्रातील तमाम दिग्गज हजेरी लावणार आहेत.


मुंबईआधी 21 डिसेंबरला विरुष्काने दिल्लीत रिसेप्शन दिलं होतं. यात पंतप्रधान मोदींसह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. विराट आणि अनुष्काने 11 डिसेंबर रोजी इटलीत डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं.

लोअर परेलमध्ये जंगी पार्टी
लोअर परेलमधील हॉटेल St Regis मध्ये बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. यात शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, करण जोहर, कतरिना कैफ, राणी मुखर्जीसह इतर सेलिब्रिटी सहभागी होतील.

हॉटेलच्या गच्चीवर पार्टी
हॉटेलच्या गच्चीवर ही पार्टी आयोजित केली आहे. या पार्टीत 300 पेक्षा जास्त पाहुणे येण्याची शक्यता आहे. हॉटेलची सजावट फूल, लाईट आणि मेणबत्त्यांनी केली आहे. रात्री 8 वाजता विरुष्काच्या पार्टीला सुरुवात होईल. वाहतूक कोंडीपासून वाचण्यासाठी सेलेब्रिटींना वेळेआधीच पोहोचण्याची विनंती करण्यात आली आहे.

क्रिकेटसह उद्योग विश्वातील दिग्गजांची हजेरी
क्रिकेट विश्वातूनही अनेक दिग्गज रिसेप्शनला हजेरी लावणार आहे. दिल्लीतील रिसेप्शनमध्ये जे आले नव्हते, ते मुंबईत उपस्थिती लावतील. यात सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंहसह अनेक क्रिकेटरचा समावेश आहे. याशिवाय रिलायन्सचे मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्यासह अनेक बिझनेस टायकूनही विरुष्काला शुभेच्छा देण्यासाठी येतील.

दिल्लीच्या रिसेप्शनला पंतप्रधानांची हजेरी
विराट आणि अनुष्काचं दिल्लीचं रिसेप्शन विशेषत: विराटच्या नातेवाईकांसाठी होतं. कारण विराटचं कुटुंब दिल्लीत राहतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावल्याने या सोहळ्या चारचांद लागले होते. याशिवाय रिसेप्शनमध्ये सुरेश रैना, गौतम गंभीर आणि शिखर धवननेही हजेरी लावली होती.