चेन्नई : दाक्षिणात्य सिनेमातील सुपरस्टार ‘थलायवा’ रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. स्वत: रजनीकांत यांनी यासंदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र अधिकृत घोषणा 31 डिसेंबरला जाहीर करणार असल्याचे रजनीकांत यांनी स्पष्ट केले.
रजनीकांत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार की स्वतंत्र पक्ष काढणार यासंदर्भात थर्टी फर्स्टच्या मुहूर्तावर घोषणा करणार आहेत. आजपासून पुढचे सहा दिवस रजनीकांत आपल्या चाहत्यांची भेट घेणार आहेत. 26 ते 31 डिसेंबर दरम्यान चेन्नईच्या राघवेंद्र कल्याणा मंडमपमध्ये चाहत्यांना भेटणार आहेत.
रजनीकांत नेमकं काय म्हणाले?
“मला राजकारण नवीन नाही. फक्त उशीर झाला आहे. मात्र माझा राजकीय प्रवेश हा एकप्रकारे विजयासारखाच असेल. मी 31 डिसेंबरला यासंदर्भातील निर्णय जाहीर करेन.”, असे रजनीकांत यांनी सांगितले. त्यामुळे राजकारणात रजनीकांत यांचा प्रवेश जवळपास निश्चित मानला जातो आहे.
तसे, राजकारण हे क्षेत्र रजनीकांत यांच्यासाठी नवीन नाही. याआधी 1996 साली डीएमकेला समर्थन देत रजनीकांत यांनी जयललिता यांच्याविरोधात प्रचारही केला होता आणि त्यावेळी जयललिता यांच्या पक्षाचा पराभव झाला होता.
काही दिवसांपूर्वी चाहत्यांशी संवाद साधताना, रजनीकांत म्हणाले होते की, “जर मी राजकारणात प्रवेशाचा निर्णय घेतला, तर वाईट प्रवृत्तीच्या लोकांना सदैव दूर ठेवेन.”
दरम्यान, दाक्षिणात्य सिनेमातील कलाकारांनी राजकारणात प्रवेश करणे, यात काही विशेष वाटण्याजोगे नाही. कारण याआधीही अनेकांनी राजकारणात प्रवेश करुन अगदी मुख्यमंत्रिपदासोबत केंद्रीय मंत्रिपदापर्यंतही झेप घेतली आहे.
एमजी रामचंद्रन असो वा चिरंजीवी, असे अनेकजण राजकारणाचा उंबरठा ओलांडत अगदी मंत्रिपदापर्यंत पोहोचले. राजकारणात यश मिळवले. शिवाय, आता अभिनेते कमल हसन सुद्धा राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकंदरीतच दक्षिण भारतातील राजकारणात येत्या काळात नव्या घडामोडी पाहायला मिळतील, यात शंका नाही.
एन्ट्री हाच विजय असेल, रजनीकांत राजकारणात!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Dec 2017 10:03 AM (IST)
राजकारण हे क्षेत्र रजनीकांत यांच्यासाठी नवीन नाही. याआधी 1996 साली डीएमकेला समर्थन देत रजनीकांत यांनी जयललिता यांच्याविरोधात प्रचारही केला होता आणि त्यावेळी जयललिता यांच्या पक्षाचा पराभव झाला होता.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -