Vikram Vs Samrat Prithviraj: बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) स्टारर 'सम्राट पृथ्वीराज' (Samrat Prithviraj) 3 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तर, कमल हासनचा (Kamal Haasan) बहुचर्चित 'विक्रम' (Vikram) देखील याच दिवशी प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर चांगलीच टक्कर पाहायला मिळाली आहे. प्रदर्शनापूर्वी अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाविषयी बरीच चर्चा निर्माण झाली होती. पण, तो प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे विशेष आकर्षित करू शकला नाही.
'सम्राट पृथ्वीराज'ने पहिल्या दिवशीच संथ सुरुवात केली होती. त्यानंतर वीकेंडमध्येही फारशी प्रगती दिसून आली नाही. तर, दुसरीकडे कमल हासनचा 'विक्रम' तिकीट बारीवर धमाल करत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी केलेली कमाई पुढे कायम ठेवली.
'सम्राट पृथ्वीराज' संथगतीने सुरु
यशराज बॅनरचा 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट जगभरात 5000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. तर, भारतात 3750 स्क्रीन्सवर रिलीज झाला. चित्रपटाने शुक्रवारी 10.70 कोटी, शनिवारी 12.60 कोटींचा गल्ला जमवला. तर काही रिपोर्ट्स नुसार, चित्रपटाने तिसऱ्या दिवशी जवळपास 16.20 कोटींचा व्यवसाय केला आहे. अशा प्रकारे या चित्रपटाने 3 दिवसात 39.50 कोटींची कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशीची अधिकृत कमाई वेगळी असल्यास, यात बदलही होऊ शकतो.
'सम्राट पृथ्वीराज'मध्ये अक्षय-मानुषीसोबत सोनू सूद आणि संजय दत्तही महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे.
'विक्रम'ची धडाकेबाज कामगिरी
कमल हासनच्या 'विक्रम' चित्रपटाने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण केला आहे. चाहत्यांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ होती. 'विक्रम'चे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केले आहे. कमल हासनसोबत या चित्रपटात विजय सेतुपती आणि फहाद फासिल यांचा समावेश आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी शुक्रवारी 32.05 कोटी, शनिवारी 28.70 कोटींची कमाई केली आहे. अंदाजे आकडेवारीनुसार या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी जवळपास 31 कोटींची कमाई केली आहे. तीन दिवसांत चित्रपटाचे एकूण कलेक्शन 91.75 कोटी इतके आहे. तर, आजच्या दिवसात अर्थात सोमवारी हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा पार करू शकतो. जागतिक बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अवघ्या 3 दिवसांत 150 कोटींचा टप्पा पार केला आहे.
हेही वाचा: