Vikram Box Office Collection : प्रेक्षकांमध्ये सध्या दाक्षिणात्य सिनेमांची क्रेझ पाहायला मिळत आहे. तीन महिन्यांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेता कमल हासनचा (Kamal Haasan) 'विक्रम' (Vikram) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. कमल हासनने या सिनेमाच्या माध्यमातून पाच वर्षांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पण कमलने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. आतापर्यंत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 426 कोटींची कमाई केली आहे.
कमल हासनचा 'विक्रम' हा सिनेमा 3 जून 2022 रोजी हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. लोकेश कनगराजने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती आणि फहाद फासिल या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. जगभरात विक्रम सिनेमाने 426 कोटींचा गल्ला जमवला आहे.
भारतात 'विक्रम'चा धमाका
'विक्रम' सिनेमाने जगभरात 426 कोटींचा गल्ला जमवला असून भारतातदेखील या सिनेमाने धमाका केला आहे. भारतात 'विक्रम' 300 कोटींच्या क्लबमध्ये सामिल झाला आहे. विक्रम सिनेमाने भारतात 301 कोटींची कमाई केली आहे. तर तामिळनाडूमध्ये विक्रमने 181 कोटींची कमाई केली आहे. केरळमध्ये 40 कोटी तर कर्नाटकमध्ये 25 कोटींची कमाई केली आहे.
'विक्रम' ओटीटीवर रिलीज!
'विक्रम' हा सिनेमा जगभरात 3200 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. 150 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमातील संवाद आणि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. सिनेमागृहात धुमाकूळ घालणारा 'विक्रम' सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील रिलीज झाला आहे. त्यामुळे घरबसल्या हा सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या