Eknath Shinde:  दिग्दर्शक विजू माने (Viju Mane) हे सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करतात.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विजू माने यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. विजू माने यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी खास कॅप्शन दिलं आहे.

  


विजू माने यांची पोस्ट


विजू माने यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं,  "राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी गेली जवळपास 20 वर्ष (कोरोनातली दोन वर्षे वगळता) आमच्या घरच्या गणपतीच्या दर्शनाला येण्याचा शिरस्ता या वर्षीही मोडला नाही. आभार मानून अपमान करणार नाही परंतु या व्यक्तीच्या या वृत्तीचं कौतुक केलं पाहिजे. ते एक आमदार असताना, मग मंत्री झाल्यावर आणि आता मुख्यमंत्री झाल्यावरचं सलग दुसरं वर्ष ते आमच्या घरी आले.मी, माननीय शरद पवार ह्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने सर्वसामान्य माणसाला भेटी गाठी दिल्याचे अनेक किस्से ऐकले आहेत. परंतु सन्माननीय एकनाथजी शिंदे ही मला आलेली प्रचिती आहे. राजकारण आपल्या जागी असेल परंतु माझ्या मते याला समाजकारण म्हणावं."


पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, "थेट संपर्कातून, संवादातून समाजभान जपण्याचं द्योतक आहे हे. केवळ माझ्या घरी आले, म्हणून मी हे सांगतो आहे असं नाही. माझ्या बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये शिरता शिरता आमच्या बिल्डिंग मधल्या एका व्यक्तीने त्यांना विनंती केली माझ्या घरी गणपतीला याल का? मला माहिती होतं, साहेबांची तब्येत बरी नाहीये. त्यांना थ्रोट इन्फेक्शन, शिवाय तापही आहे आणि तरीही त्यांनी त्या व्यक्तीची विनंती नाकारली नाही. मलाही त्यांच्या घरी घेऊन गेले आणि त्यांच्याही घरच्या गणपतीचे दर्शन घेतले."






"कै. धर्मवीर आनंद दिघे यांचा सर्वसामान्यांमध्ये असलेला करिष्मा त्यांच्या दांडग्या जनसंपर्कामध्ये होता. यात सगळ्यात महत्त्वाचं स्थान गणेशोत्सवाला आहे. दिवस-रात्र गणेशोत्सव मंडळ आणि जी कोणी व्यक्ती आमंत्रित करेल त्या व्यक्तीच्या घरच्या श्री गणेशाचे दर्शन हा पायंडा त्यांनी पाडला होता. त्याच पावलांवर पाऊल ठेवत आपली सामान्य जनतेशी असलेली नाळ तुटणार नाही याची काळजी एकनाथ शिंदेसाहेब घेत आहेत हे खचितच भूषणावह आहे." असंही विजू माने यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


Viju Mane Post : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमध्ये अशी काही जादू आहे की...’, दिग्दर्शक विजू मानेंची पोस्ट चर्चेत!