मुंबई : चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या राजीव मसंद यांना काही दिवसांपूर्वी मुंबई अंधेरीतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राजीव मसंद यांच्या विश्वस्त सूत्रांनी एबीपीला दिलेल्या माहितीनुसार, "आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या राजीव मसंद यांची प्रकृती नाजूक आहे. मागील 25 वर्षांपासून चित्रपट पत्रकारिता करणाऱ्या राजीव मसंद यांचं वय 42 वर्षे आहे.


काही महिन्यांपूर्वीच राजीव मसंद चित्रपट पत्रकारितेपासून दूर झाले होते. निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर आणि बंटी सजदेह यांच्या 'धर्मा‌ कॉर्नरस्टोन एजन्सी' (डीसीए) या नव्या टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचे सीओओ बनले होते.


राजीव मसंद यांनी वयाच्या सोळाव्या वर्षीच पत्रकारितेची सुरुवात इंग्लिश वृत्तपत्र  'टाइम्स ऑफ इंडिया'मधून केली होती. त्यांनी काही वर्षे 'इंडियन एक्स्प्रेस'मध्येही चित्रपट पत्रकार म्हणून काम केलं होतं. यानंतर राजीव मसंद काही वर्षे हिंदी न्यूज चॅनल 'स्टार न्यूज'सह (आता एबीपी न्यूज) चित्रपट समीक्षक आणि पत्रकार म्हणून जोडले गेले होते. 'स्टार न्यूज'मध्ये ते 'मसंद की पसंद'चं चित्रपटांशी संबंधित कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तसंच समीक्षणही करत होते.


यानंतर राजीव मसंद 2005 मध्ये लॉन्च झालेली 'सीएनएन आयबीएन' या इंग्लिश वृत्तवाहिनीत सहभागी झाले. या वाहिनीवर दर शुक्रवारी चित्रपटांवर आधारित प्रसारित होणारा त्यांचा 'नाऊ शोईंग' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला. या वृत्तवाहिनीत त्यांनी सुमारे 15 वर्षे काम केलं. काही महिन्यापूर्वीच राजीव मसंद 'धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सी'मध्ये सीओओ पदावर रुजू झाले होते.


राजीव यांनी चित्रपट पत्रकार म्हणून 'कान्स' फिल्म फेस्टिव्हलसह जगभरातील अनेक प्रतिष्ठित चित्रपट महोत्सव देखील कव्हर केले. राजीव मसंद अनेक वर्षांपासून मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेज (MAMI) फिल्म महोत्सवाचा भाग होते. तसंच मुंबईत आयोजित होणाऱ्या या महोत्सवासाठी त्यांनी आपली सेवा दिली. त्यांना तीन वेळा 'बेस्ट एन्टरटेन्मेंट क्रिटिक' एनटी अवॉर्ड्सही मिळाला आहे.