मुंबई : ज्येष्ठ चित्रपट, टीव्ही आणि नाट्य अभिनेते टॉम अल्टर यांचं कर्करोगानं शुक्रवारी रात्री निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. अल्टर यांना त्वचेचा कॅन्सर झाला होता आणि तो चौथ्या स्टेजला पोहचला होता. मुंबईतील सैफी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
टॉम अल्टर यांनी वीर-झारा, भेजा फ्राय, विरुद्ध, अलग, बोस, यासारख्या तीनशेहून अधिक चित्रपटात लहान-मोठ्या भूमिका केल्या आहेत. जुनून, शक्तिमान, जबान संभालके यासारख्या टीव्ही मालिकांतील त्यांच्या व्यक्तिरेखाही गाजल्या आहेत. ‘दप्तर’ या मराठी चित्रपटातही अल्टर झळकले होते. त्यांनी काही चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं होतं.
80 च्या दशकात त्यांनी क्रीडा पत्रकारिता केली असून भारतासाठी पदार्पण करण्यापूर्वी सचिन तेंडुलकरची टीव्हीसाठी मुलाखत घेणारे ते पहिलेच मुलाखतकार ठरले होते. अल्टर यांनी तीन पुस्तकांचं लेखनही केलं.
कला आणि चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी 2008 मध्ये टॉम अल्टर यांना पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आलं होतं.
ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांची कर्करोगाशी झुंज
टॉम अल्टर यांचा अल्पपरिचय
1950 मध्ये टॉम अल्टर यांचा मसूरीमध्ये जन्म झाला. अमेरिकन वंशाचे टॉम भारतात जन्मणारी त्यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी होते. त्यांचं शालेय शिक्षण वूडस्टॉक स्कूलमध्ये झालं, त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी येल विद्यापीठात गेले. 1970 नंतर ते पुन्हा भारतात आले.
पुण्यातील एफटीआयआय मध्ये त्यांना 1972 मध्ये प्रवेश मिळाला. उत्तर भारतातील 800 जणांमधून केवळ 3 विद्यार्थ्यांना निवडण्यात आलं, ज्यात अल्टर यांचा समावेश होता.
त्यांनी अभिनयामध्ये डिप्लोमा केला ज्यात त्यांना सुवर्णपदकानं गौरवण्यात आलं.