मुंबई : 'टांग टिंग टिंगाक, टांग टिंग टिंगाक, टांग टिंग टिंगाक, टुंग' ही गाण्याची धून वाजली की डोळ्यासमोर येणारा एकमेव चेहरा म्हणजे दिग्गज अभिनेते विजय चव्हाण यांचा. 'मोरुची मावशी' नाटकामुळे लोकप्रिय झालेल्या विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने मुंबईत निधन झालं. फुफ्फुसाच्या आजारामुळे फोर्टिस रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. ते 63 वर्षांचे होते. रंगभूमी, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये लीलया वावरणारा अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला.
विजय चव्हाण यांचा जन्म मुंबईतील लालबागमध्ये झाला होता. भारतमाता चित्रपटगृहाच्या मागे असलेल्या हाजी कासम चाळीत ते लहानाचे मोठे झाले. दादरच्या इंग्लिश स्कूलमध्ये शालेय शिक्षण झाल्यावर विजय चव्हाणांनी रुपारेल कॉलेजमधून बीएची पदवी घेतली. कॉलेजमध्ये असताना त्यांनी अनेक एकांकिकांमध्ये भाग घेतला होता.
विजय कदम, विजय चव्हाण आणि एक मित्र या तिघांनी मिळून 'रंगतरंग' नावाची नाट्यसंस्था सुरु केली. त्यानंतर त्यांची लक्ष्मीकांत बेर्डेंशी ओळख झाली. त्या वेळी पुरुषोत्तम बेर्डे 'टूरटूर' नाटक करत होते. लक्ष्मीकांत बेर्डेंनी त्यांना विजय चव्हाणांचं नाव सुचवलं.
या नाटकातूनच त्यांना 'हयवदन' हे नाटक मिळालं. या नाटकाचे भारतभरासोबतच परदेशातही प्रयोग झाले. हे नाटक पाहून त्यांना सुधीर भटांनी 'मोरुची मावशी' नाटकासाठी विचारणा केली. त्यावेळी विजय चव्हाण मफतलाल कंपनीत नोकरी करत होते. ही नोकरी सांभाळून त्यांनी या नाटकाचे प्रयोग सुरु केले.
आचार्य अत्रे लिखित 'मोरुची मावशी' या नाटकात त्यांनी रंगवेलं स्त्री पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेलं. या नाटकात विजय चव्हाणांचं विनोदाचं टायमिंगही भाव खाऊन गेलं. 'मोरुची मावशी' नाटकाने दोन हजारापेक्षा जास्त प्रयोग करत रंगभूमीवर इतिहास घडवला.
त्यानंतर चव्हाण यांना 'तू तू मी मी' हे नाटक मिळालं. या नाटकात त्यांनी 14 भूमिका साकारल्या होत्या. अक्षरशः काही सेकंदांमध्ये वेशभूषा बदलून ते रंगभूमीवर यायचे आणि प्रेक्षकही अवाक व्हायचे.
मोरुची मावशी, तू तू मी मी, श्रीमंत दामोदर पंत, टुरटुर यासारखी त्यांची शेकडो नाटकं प्रचंड गाजली आहेत. विजय चव्हाणांनी जवळपास 350 ते 400 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 1985 साली प्रदर्शित झालेल्या वहिनीची माया चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.
विजय चव्हाण यांची गाजलेली नाटकं
मोरुची मावशी
कार्टी प्रेमात पडली
लहानपण देगा देवा
तू तू मी मी
श्रीमंत दामोदर पंत
हयवदन
कशात काय लफड्यात पाय
जाऊ बाई हळू
टूरटूर
बाबांची गर्लफ्रेंड
देखणी बायको दुसऱ्याची
विजय चव्हाण यांचे गाजलेले चित्रपट
वहिनीचा माया
घोळात घोळ
धुमाकूळ
शेम टू शेम
माहेरची साडी
बलिदान
शुभमंगल सावधान
एक होता विदूषक
माझा छकुला
चिकट नवरा
धांगडधिंगा
पछाडलेला
अगंबाई अरेच्चा
जत्रा
चष्मे बहाद्दर
इश्श्य
जबरदस्त
बकुळा नामदेव घोटाळे
वन रुम किचन
श्रीमंत दामोदर पंत
झपाटलेला
असे पाहुणे येती, माहेरची साडी, येऊ का घरात, रानफूल, लाइफ मेंबर यासारख्या नव्या-जुन्या मालिकांमध्येही विजय चव्हाणांनी भूमिका साकारल्या आहेत. मनोरंजन विश्वात जवळपास 40 वर्षांची त्यांची कारकीर्द होती.
विजय कदम, अशोक सराफ, प्रशांत दामले, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर यासारख्या कलाकारांसोबत त्यांनी अनेक नाटक-चित्रपटात भूमिका केल्या. मदतीला धावून जाणारा मित्र गेल्याची भावना मनोरंजन विश्वातून व्यक्त केली जात आहे.
विजय चव्हाण यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. काहीच महिन्यांपूर्वी विजय चव्हाण यांना महाराष्ट्र सरकारच्या व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यावेळी ते व्हिलचेअरवरुन रंगमंचावर आल्याचं पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता.