विजय चव्हाण यांचं निधन मुंबई: ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजय चव्हाण यांच्या जाण्याने वैयक्तिक नुकसान आणि एक जवळचा मित्र गमावल्याची भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली. ते एबीपी माझाशी बोलत होते.

अशोक सराफ यांची प्रतिक्रिया

"विजय चव्हाण यांच्या जाण्याने खरोखरच एक पोकळी निर्माण झाली आहे. एक हरहुन्नरी नट, कुठल्याही भूमिकेत चपखल बसणारा असा विजय होता. ‘मोरुची मावशी’ या नाटकातील मावशीची भूमिका अजरामर आहे. एक नट तर गेलेला आहेच पण एक जवळचा मित्र गेला याचं दु:ख अधिक आहे.

आम्ही बऱ्याच चित्रपटात कामं केली. प्रत्येकवेळी त्याने स्वत:ची छाप सोडली. चांगला मित्र गेला याचं जास्त दु:ख आहे.

विजयने शून्यातून करिअर सुरु केलं. काही जणांना निसर्गदत्त असतं, काहींना स्वत:ला कर्तृत्त्वाने निर्माण करावं लागतं. मावशीच्या रोलने त्याने फार काही मिळवलं. त्याने स्वत:च्या कर्तृत्त्वाने मिळवलं. विजयची शैली वेगळी होती. त्याने स्वत:ची स्टाईल निर्माण केली होती. त्यामुळे ती इंडस्ट्रीच्या दृष्टीने महत्त्वाची होती", अशी भावना अशोक सराफ यांनी व्यक्त केली.

वाचा - 'मोरुची मावशी' विजय चव्हाण यांची कारकीर्द 

अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. फुफ्फुसाच्या आजारामुळे फोर्टिस रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. ते 63 वर्षांचे होते.  विजय चव्हाण यांच्या रुपाने मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांना गेली 40 वर्षे व्यापून टाकणारा अष्टपैलू अभिनेता महाराष्ट्राच्या कलाविश्वाने गमावला आहे. विजय चव्हाण यांचं बालपण मुंबईतील करीरोडच्या गिरणगाव भागात गेले. शालेय शिक्षण दादरच्या इंग्लिश स्कूलमध्ये झालं. त्यानंतर रुपारेल कॉलेजमधून त्यांनी बीएची पदवी घेतली.

रंगभूमी, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये लीलया वावरणारा अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला.