मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडली आहे. दिलीप कुमार यांच्या छातीत संसर्ग झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिलीप कुमार 95 वर्षांचे आहेत.

दिलीप कुमार यांनी छातीत दुखू लागल्यामुळे अस्वस्थ वाटत होतं. त्यामुळे दुपारी चार वाजताच्या सुमारास त्यांना वांद्रे परिसरातील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊण्टवरुन याविषयी माहिती देण्यात आली आहे.

दिलीप कुमार यांना सध्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं असून डिस्चार्जबाबत उद्या निर्णय घेण्यात येणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दिलीप कुमार यांना अनेक वेळा रुटिन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल केलं जातं, त्यामुळे काळजीचं कारण नसल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं.


वयाच्या 22 व्या वर्षी म्हणजेच 1944 मध्ये 'ज्वार भाटा' चित्रपटातून त्यांनी चित्रपटात पदार्पण केलं. सहा दशकांच्या कारकीर्दीत त्यांनी जवळपास 65 चित्रपटांमध्ये अभिनय केला. देवदास, आन, राम और शाम, नया दौर यासारख्या चित्रपटांप्रमाणे ऐतिहासिक 'मुघल-ए-आझम' सिनेमात त्यांनी साकारलेली सलीमची भूमिका प्रचंड गाजली होती. 1998 साली प्रदर्शित झालेल्या 'किला' चित्रपटानंतर दिलीप कुमार मोठ्या पडद्यावर झळकलेले नाहीत.