Amitabh Bachchan Covid 19 : बॉलिवूड सुपरस्टार अभिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. अमिताभ यांनी स्वतः ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट केलं आहे," मी नुकतीच कोरोना चाचणी केली असून कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करावी'.
अमिताभ बच्चन यांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सोबतच त्यांच्या घरातील स्टाफचा कोरोना चाचणी करण्यात आलीय. सर्वांनी स्वतःला क्वॉरंटाईन करुन घेतले आहे. कुटुंबातील सदस्य आणि स्टाफचा रिपोर्ट येणे बाकी आहे.
'कौन बनेगा करोडपती 14' (Kaun Banega Crorepati 14) हा कार्यक्रम 7 ऑगस्ट पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या कार्यक्रमच्या सूत्रसंचालनाची धुरा अमिताभ बच्चन सांभाळत आहेत. आता त्यांना कोरोनाची लागण झाल्याने 'कौन बनेगा करोडपती 14'चे शूटिंगलादेखील ब्रेक लागला आहे.
अमिताभ बच्चन यांना पहिल्या लाटेतदेखील कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी अमिताभ यांच्यासह अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्यालादेखील कोरोनाची लागण झाली होती. पहिल्या लाटेत अमिताभ यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ
आज मुंबईत 832 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मागील 24 तासांत दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,675 झाली आहे. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईमध्ये 6269 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 970 दिवसांवर गेला आहे.
संबंधित बातम्या