मुंबई : बंटी और बबली, स्पेशल 26 सारख्या चित्रपटांच्या कथा मोठ्या पडद्यावर मनोरंजक वाटतात. मात्र चक्क बॉलिवूड स्टार्सनाच अशाप्रकारे ठकसेनांनी लुबाडल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. वरुण धवन, श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ या बॉलिवूडच्या नव्या कलाकारांना दोघा जणांनी गंडा घातल्याचं उघड झालं आहे.

 
आयकर विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करुन श्रद्धा कपूर, वरुण धवन आणि टायगर श्रॉफ यांच्याकडून आरोपींनी हजारो रुपये उकळल्याचा आरोप आहे. प्रत्येकाकडून घेतलेली रक्कम 40 ते 75 हजारांच्या घरात असल्याची माहिती आहे.

 
याप्रकरणी 36 वर्षीय मुरली मुंढेरा आणि 41 वर्षीय महेश खेतवानी यांना मुंबई क्राईम ब्रांचने अटक केली आहे. दोन्ही आरोपींनी आपण या तिघांशिवाय अनेक बॉलिवूड ताऱ्यांना चुना लावल्याची कबुली दिली आहे.

 
घरावर आयकर विभागाची धाड घालू अशी धमकी ते देत असत. ठाण्याच्या आयकर विभागात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांची वागण्या-बोलण्याची पद्धत दोघांनी आत्मसात केली होती. श्रद्धा, वरुण, टायगर व्यतिरिक्त इतर क्षेत्रातील काही व्यक्तींनाही त्यांनी लुबाडल्याची शक्यता आहे.